वाठार स्टेशन : दोन वर्षांत झालेल्या दमदार पावसाने कोरेगाव तालुक्यातील एकमेव असलेल्या वसनामाईची ओठी यंदा भरमसाठ वाळूने भरली आहे. या नदी पात्रातून रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी सुरू आहे. मातीमिश्रित वाळूच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत देऊरमधून करोडो रुपयांची अवैध वाळू चोरी झाली आहे. महसूलचे कर्मचारी व वाठार पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी या वाळू चोरांकडून चिरीमिरी घेऊन या चोरांना ओझं उचलून देण्याचे काम करत असल्याने हा उद्योग आता बंद करण्याचे आवाहन देऊर ग्रामस्थ करत आहेत.
वसना नदी पात्राकडेच्या खासगी मळवीतून हा उपसा कायमस्वरूपी सुरू आहे. एकीकडे गावात वाळू बंदीचा ठराव असताना दुसरीकडे मात्र अशाप्रकारे रात्रीच्यावेळी वाळू उपसा करायचा, हा उद्योग नक्की बंद होणार का? जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत लक्ष देण्याची गरज असून, वसना तिराकडील सर्व जमीनधारकांच्या जमिनीची पाहणी करून अहवाल तयार करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी देऊर ग्रामस्थांनी केली आहे. राजरोसपणे रात्रीच्या अंधारात चाललेला हा गोरखधंदा रोखण्यासाठी चौकीदारच चोर बनल्याने हा उद्योग बंद करण्यासाठी आता फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेच आहे.