लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविडच्या पहिल्या लाटेत तत्पर असलेले जिल्हा प्रशासन आता संथ वाटत आहे. आरोग्य यंत्रणेच्या क्षमतांच्या पुढे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अवाक्याबाहेर सगळं सुरू असल्याने प्रशासनाच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. या परिस्थितीत प्रशासनाच्या भरवशावर बसण्यापेक्षा आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार असल्याचे निश्चित करून सामाजिक वर्तन सुधारण्याची आणि कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा विस्फोट सुरू आहे. गतवर्षी परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येकाला शोधून त्यांना सक्तीने विलगीकरणामध्ये ठेवले जायचे. आता मात्र ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली आहे. कोरोनाचा कहर लक्षात घेऊन चाकरमानी जन्मभूमीत आले; पण गावच्या हवेत त्यांना सुरक्षिततेचा विसर पडलेला दिसतोय. वयस्क पालकांसोबत आल्या दिवसापासून राहिल्याने ज्येष्ठांनाही त्याचा त्रास सोसावा लागला. प्रशासनाने नियम घालून दिले, तरी त्याचे पालन करणे अनेकांना कमीपणाचे वाटत असल्याचे चित्र बाहेर दिसत आहे.
गेल्या चार महिन्यांत कोरोनाची लाट शमल्याची धारणा करून प्रशासन गाफील राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष केवळ पाऊस आणि वादळासाठीच्या तयारीत सज्ज राहतो. कोविडचे आलेले संकट सोसण्यासाठी आणि सुसह्य करण्यासाठी ॲक्शन प्लॅनच त्यांच्याकडे उपलब्ध नाही. प्रत्येकवेळी केवळ वरून आलेले आदेश पुढे ढकलण्यापुरते काम या कार्यालयातून होते. कोविड मुक्तीसाठी सातारा पॅटर्न राबवावा, रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मानसिकता आढळत नाही. त्यामुळे सामान्यांनी शासनाच्या भरवशावर बसण्यापेक्षा स्वत:ची काळजी स्वत: घेऊन सुरक्षित राहण्याची स्थिती येऊन ठेपली आहे.
चौकट :
कोविड रुग्णांच्या कुटुंबियांना आयसोलेशन सोय नाही
शहरी आणि ग्रामीण भागात सर्वत्रच सध्या कोविड रुग्णांचा स्फोट होतोय. कुटुंबातील एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली, तर उपचार करण्यासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने घरीच सोय करावी लागत आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियांची कुठेही सोय होत नाही. ते सायलेंट कॅरिअर असल्याच्या भीतीने त्यांना कोणाकडे जाऊन राहणे म्हणजे बाधितांची संख्या वाढविण्यासारखे आहे. त्यामुळे बाधित रुग्ण एका खोलीत आणि अन्य कुटुंबीय दुसऱ्या खोलीत राहतात; पण टॉयलेट, बाथरूम एकच असल्याने कुटुंबियांनाही याचा संसर्ग होतो. बाधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयीचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
कोट :
प्रशासकीय पातळीवर यंत्रणा कोसळली आहे. कुठल्याही बाबतीत जिल्हा प्रशासन मंत्रालयाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत राहते. स्वत:हून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत नाही. आम्हाला शासनाच्या गाईडलाईन फॉलो कराव्या लागतात, असे सपक उत्तर महामारीच्या परिस्थितीत ऐकणे संतापदायी आहे. स्वयंसेवी संस्था आणि जिल्ह्यातील मान्यवरांना एकत्र करून त्यांच्याकडे जबाबदारी देऊन वॉरफ्रंटवर काम करणे अपेक्षित आहे.
- संग्राम बर्गे, कोविड डिफेंडर ग्रुप, सातारा