सातारा : शहरातील बड्या धेंड्यांच्या अतिक्रमणांकडे कानाडोळा करून गरीब लोकांना रस्त्यावर आणले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षासह सत्ताधारी नगरसेवकांनीही पालिकेच्या सभेत जाहीरपणे केला. अतिक्रमणांबाबत सत्ताधारी नगरसेवकांनीही आवाज उठविल्याने आता प्रशासनाची ‘चिंता’ मिटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या कालावधीनंतर शुक्रवारी पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात पार पडली. सभेच्या सुरुवातीला नगरसेवक रवींद्र पवार यांनी फुटका तलावाशेजारच्या अतिक्रमणाबाबतचा मुद्दा उपस्थित केला. पवार म्हणाले, ‘फुटका तलावाशेजारची पालिकेच्या जागेत चंद्रशेखर चोरगे यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत आम्ही अनेकदा आंदोलन केले. हा विषय हायकोर्टात प्रलंबित असल्याचे कारण गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून पालिका प्रशासन पुढे करत आहे. वास्तविक, उच्च न्यायालयाने हे अतिक्रमण पाडण्याचे आदेश दिले असतानाही ‘कुठल्यातरी’ भीतीमुळे त्यावर कारवाई केली जात नाही. याबाबत एक तर प्रशासन कमी पडतेय, अथवा पालिका अधिकारी संबंधितांना सामील असावेत.’विरोधी पक्षनेते अॅड. बाळासाहेब बाबर यांनी मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढली जात नसून लागेबांधे, राजकारण बाजूला ठेवून कारवाई करण्याची मागणी केली. नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांनीही नियोजन, अतिक्रमण व स्थावर जिंदगी या तीन विभागांकडून कारवाईबाबत एकमेकांकडे बोटे दाखविली जात असल्याचा आरोप केला. सभेने २८ पैकी २६ विषयांना मंजुरी दिली. रस्त्यांच्या प्रकल्प अहवालाला विरोधी पक्षाने विरोध केला. (प्रतिनिधी)लेखापाल जाधव बनले मुख्याधिकारीमुख्याधिकारी अभिजित बापट हे पालिकेच्या कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत सभेचे कामकाज करता येणार नसल्याचे विरोधी पक्षनेते अॅड. बाळासाहेब बाबर यांनी स्पष्ट केले. ‘कायदा तुम्ही किंवा मी बनविला नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्याधिकाऱ्यांना सभेला उपस्थित राहणे आवश्यक होते; परंतु तेही उपस्थित नाहीत. यावर मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये लेखापाल हेमंत जाधव हे सभेचे कामकाज संभाळतील,’ असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष सचिन सारस यांनी केले.कोण काय म्हणाले?नगरसेवकांच्या वॉर्ड निधीचं काय नियोजन केलंय : अलका लोखंडेविकास कराच्या रूपाने नागरिकांची पिळवणूक : अशोक मोनेबांधकाम व्यावसायिकांकडून शहरातील गटारांचे नुकसान : जयेंद्र चव्हाणगटारांची कामे ‘क्वालिटी’ची करा : अशोक मोनेआधुनिक दिव्यांनी होऊ शकते वीज बचत : प्रवीण पाटीलअडीच कोटी खर्चूनही शहरात अस्वच्छता : अॅड. बाळासाहेब बाबर
अतिक्रमणांवर ‘मेहेरबानी’ नाही !
By admin | Published: November 21, 2014 9:36 PM