लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : तालुक्यातील राजाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, नर्स हे लस देण्यासाठी दुजाभाव करीत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांकडून करण्यात आला. तसेच संबंधितांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना एका खोलता कोंडून ठेवले. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
राजाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर गावांतील ग्रामस्थांना लस मिळत नाही, असा आरोप करत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये बुधवारी बाचाबाची झाली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची चूक नसताना त्यांना कोंडून ठेवण्यात आल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे अतिशय चुकीचे आहे. राजकीय व गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या दबावामुळे हा प्रकार घडला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. फलटण उपविभागीय अधिकारी यांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करून राजाळे येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.