बाबासाहेब कदम ।वारणा कापशी : पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षातील बहुतांश महिने वणवण भटकंती करीत फिराव लागतं. आम्हालाबी वाटतं पोरांनी शिकावं, सरकारी नोकरी करावी; परंतु गरिबीचा शाप घेऊन जन्माला आलेल्या आमच्यासारख्यांची स्वप्नं उन्हातानात विरून जातात. पर्यायाने आमच्या लेकरांच्या नशिबी दगडांचे ढीगच आहेत. ही व्यथा आहे वारणा कापशी- सौेते दरम्यान रस्त्यावरील खडी फोडणाऱ्या मजूर स्त्रियांची.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून एक कोटी ५५ लाख रुपये मंजुरीच्या रस्त्याचे काम सध्या वेगाने सरू आहे. त्यासाठी विजापूरमधून आलेल्या मजूर स्त्री-पुरुषांच्या टोळ्या कार्यरत आहेत. दुष्काळी परिसर, पाण्याचे दुर्भिक्ष आणि निसर्गाची अवकृपा त्यांच्या पाचवीलाच पूजलेली. त्यामुळे दगडावर घाव घालत ढोरमेहनत केली तरच रोजीरोटीचा प्रश्न सुटतो. कामात हयगय केली तर हातातोंडाशी आलेल्या घासाला देखील मुकाव लागत. याला स्त्री- पुरुष यांच्याबरोबर लहान मुलंदेखील अपवाद नाहीत. पर्यायाने सततच्या कष्टानं हातावरील भाग्यरेषा कधीच गायब झाल्यात. त्यामुळे मनगटातील ताकदच रोजच्या भाकरीचा प्रश्न मिटवते. कडक उन्हाळ्यात आणि कडाक्याच्या थंडीतदेखील रस्त्याच्या कडेला पाल ठोकून मुलांची देखभाल करावी लागते. कामाच्या निमित्ताने दोन-तीन महिने एके ठिकाणी राहावं लागतं. जीवन मरणाच्या लढाईत पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न भेडसावत असला तरी निश्चित उत्तर मात्र नसतं. लेकरांनी भरपूर शिकावं, असं मनोमन वाटलं तरी नशिबावर हवाला ठेवून हातातील हातोड्याने दगडाशी लढावं लागतं. एका ठिकाणचं काम संपलं की पुन्हा नवीन ठिकाण, नवीन काम आणि नव्या जीवनाला सुरुवात. त्यामुळ उच्च शिक्षणाच्या अभावी कारकून, ड्रायव्हर, मुकादमाच्या पुढं आमच्या मुलांची मजल कधीजात नाही. यंत्राचा वापर वाढत चालल्याने कित्येकदा कामाचीदेखील प्रतीक्षा करावी लागते. मिळणाºया मजुरीतून जेमतेम पैसे हातात पडत असल्याने मोठी स्वप्न कधी पडतच नाहीत.