कऱ्हाड : आमची बाजू भक्कम आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्य केले असल्याने अपात्रतेबाबत आम्हाला कोणत्याच प्रकारची भीती नाही. तसेच नियमाने शिवसेना व धनुष्यबाणाची मान्यता आमच्याकडेच आहे; त्यामुळे शिवसेना आमचीच असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या हजारो फाइल पेंडिंग असूनही शिंदे सरकार त्याबाबत निर्णय घेत नाही. या प्रश्नावर बोलताना त्यांनी आमच्या सरकारचा वेग चांगलाच असल्याचे म्हटले.देसाई म्हणाले, राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सिंचनावर तब्बल ७० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, त्या निधीचा किती उपयोग झाला, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः करत याबाबतची श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली होती. असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या खासगी कार्यक्रमासाठी गावी आले असतानाही त्यांनी ६२ फाइल निकाली काढल्या. त्यामुळे आमच्या कामाचा वेग चांगलाच असून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, सरकारी तिजोरीचा विचार करून निर्णय घेतले जात आहेत.कर्नाटक निवडणुकीत शिवसेना जागा का लढवत नाही? यावर बोलताना ते म्हणाले, शिवसेनेचे महाराष्ट्रात प्राबल्य असून, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात शिवसेनेच्या शंभर जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तसेच जागावाटपाच्या प्रश्नावर ते म्हणाले, राज्यात जागावाटप कसे असेल; याबाबतचा निर्णय शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे घेतील.
माजी उपमुख्यमंत्र्यांनाच कर्नाटकात मागणी नसेलतसेच कर्नाटकमधील निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत छेडले असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मंत्री म्हणून या आधी दहा वर्षे काम केले असून त्यांना मोठा अनुभव आहे. शिवसेना हा भाजपसोबतच्या युतीतला मित्रपक्ष असून कर्नाटकमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते; परंतु, माजी उपमुख्यमंत्र्यांनाच कर्नाटकात मागणी नसेल. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे, अशी खोचक टीका त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली.
शासन आपल्या दारी उपक्रम मरळीमधून सुरूराज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्याचा प्रारंभ शनिवार, दि. १३ मे रोजी सकाळी १० वाजता मरळी येथे होणार आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री उपस्थित राहणार असून, या ठिकाणी २५ हजारांवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष योजनांचा लाभ होणार असल्याची माहिती पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितली.