खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीत लोकांच्या पसंतीस उतरलेल्या उमेदवारांनी गुलालाची उधळण केली तर अनेकांना बुक्यावरच समाधान मानावे लागले; परंतु धनगरवाडी ग्रामपंचायतीसाठी झालेल्या दोन जागेच्या निवडणुकीत अजब प्रकार घडला. उमेदवारांपेक्षा नोटालाच मतदारांनी पसंती दिल्याने विजयी घोषित कोणाला करावे? असा यक्ष प्रश्न निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच पडला. त्यामुळे निकालाचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला. निवडणुकीच्या रिंगणात नोटाही श्रेष्ठ ठरू शकतात, हेच समोर दिसून आले.
खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीत असलेल्या सात जागांसाठी ग्रामस्थांनी बिनविरोधचा फॉर्म्यूला आणला होता. यामध्ये तीन जागा बिनविरोध झाल्या तर दोन जागा उमेदवाराअभावी रिक्त राहिल्या; मात्र उर्वरित दोन जागांसाठी ३६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वसाधारण जागेसाठी जयवंत मांढरे यांना १९ मते, ज्ञानेश्वर पाचे यांना १३८ मते तर नोटाला २११ मते पडली. तर सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी चंद्रभागा कदम यांना १२५ मते, चैत्राली कदम यांना २६ मते तर नोटाला २१७ मते मिळाली. त्यामुळे भलताच पेच निर्माण झाला. खंडाळा तालुक्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. याठिकाणी काय निर्णय घ्यावा, याचा पेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पडल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
वास्तविक या दोन्ही जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले चारही उमेदवार लोकांच्या पसंतीला उतरले नाहीत. त्यामुळे नोटाला अधिक मतदान केल्यास २०१८ च्या एका निकालानुसार हे उमेदवार बाद ठरतील, असा कयास बांधून ग्रामस्थांनी नोटाचा पर्याय स्वीकारला असावा. आता निर्णय काहीही होवो; पण निवडणुकीत उमेदवार पसंतीचे नसतील तर काय होऊ शकते, याचे उदाहरण समोर आले आहे. त्यामुळे ‘गाव करील ते राव काय करील’ हेच खरे आहे, असे म्हणावे लागेल. कारण वाटलं म्हणून उभा राहिलो तर लोकांसमोर निवडणूक आयोगाने पर्याय निर्माण करून दिला आहे, याची प्रचिती या उदाहरणाने समोर आली आहे.
(चौकट)
निकालाने वेधले लक्ष
वास्तविक धनगरवाडी गाव हे विकासाच्या पथावर चालणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायतीमार्फत अनेक विविध योजना राबवून जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. स्वच्छ ग्राम अभियानात गावाचा डंका दिल्लीपर्यंत पोहोचला होता. याच गावात निवडणुकीत ग्रामस्थांनी असा निर्णय घेतल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले.