सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखाना भुईंज व किसन वीर खंडाळा साखर कारखाना यांनी मार्च २०२१ पर्यंतची एफआरपी थकवल्याने साखर आयुक्तांनी या कारखान्याला आरआरसीची (जप्ती) नोटीस बजावली आहे.
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने ४ कोटी ९० लाख ४५ हजार रुपयांची एफआरपी थकवली आहे तर खंडाळा कारखान्याने ७६ कोटी १८ लाख ७० हजार रुपयांची एफआरपी थकवली आहे. याबाबत साखर आयुक्तांनी दोन्ही कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे. ही नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनादेखील पाठविण्यात आलेली आहे. कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची थकीत देणी भागविण्यात यावी, असे या नोटिसीत म्हटले.
एफआरपी थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी राज्यातील १९ साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील या दोन्ही कारखान्यांचा समावेश आहे.
दरम्यान, या दोन्ही कारखान्यांपुढील आर्थिक अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. खंडाळा साखर कारखान्याने एकूण ६७ कोटी ६६ लाख ३७ हजार ८१९ रुपयांचे थकीत कर्ज भरले नसल्याने बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेने या कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्त करण्याची नोटीस नुकतीच प्रसिद्ध केली होती. तर कारखान्याच्या उपाध्यक्ष यांनीच माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कारखाना वाचण्यासाठी साकडे घातले होते. आता शेतकऱ्यांची थकीत देणी आणि बँकेचे थकीत कर्ज कारखाना कशा पद्धतीने भरणार, हा मोठा प्रश्न आहे. या कारखान्यावरील कारवाईबाबत संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
खंडाळा, वाई, जावली, कोरेगाव, सातारा आणि महाबळेश्वर या तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांपुढे मोठे प्रश्न उपस्थित राहिले आहेत. आगामी काळात कारखाना कसा वाचणार, त्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.