कऱ्हाड : शहरातील विविध ठिकाणच्या वृक्षांच्या फांद्या पालिकेची अथवा वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेता तोडल्या आहेत. ते कृत्य करताना वीज कंपनीने वृक्षांना इजा केल्या आहेत. त्याशिवाय वृक्षांचे हेरिटेज दर्जाचेही नुकसान केले आहे. त्याचा खुलासा तीन दिवसात न केल्यास प्रती वृक्ष एक लाख प्रमाणे शिक्षा करून वीज कंपनीवर फौजदारी खटाल दाखल करण्यात येईल, अशी नोटीस पालिकेचे मुख्याधिकारी तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष रमाकांत डाके यांनी शनिवारी वीज कंपनीला बजावली आहे.
वीज कंपनीने शुक्रवारीच पालिकेचे आठ लाखांच्या थकीत वीज बिलापोटी पालिकेचे वीज कनेक्शन तोडले. त्यानंतर दुपारी पालिकेने वीज कंपनीला विनापरवाना वृक्षांच्या फांद्या तोडल्याबद्दल नोटीस बजावली आहे. येथील दत्त चौकातील उपकार्यकारी अभियंत्यास नोटीस बजावण्यात आली आहे. पालिकेने दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, वीज कंपनीतर्फे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता शहरातील विविध ठिकाणच्या वृक्षांच्या फांद्या छाटून त्यांना इजा पोहचविली आहे. वीज कंपनीने हेरिटेज वृक्षांच्या ही फांद्या तोडल्या आहेत. ते वृक्ष हेरिटेज आहेत, तरीही वीज कंपनीने शहरातील विविध ठिकाणच्या वृक्षांच्या फांद्या विनापरवाना छाटल्या आहेत. त्यामुळे नागरी क्षेत्रातील वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे कलम आठ (एक) चे उल्लंघन झाले आहे. त्यानुसार तुम्ही वृक्षांना इजा केल्यामुळे कलम २० (क) अन्वये नोटीस देण्यात येत आहे. त्याचा खुलासा तीन दिवसात कार्यालयास करावा अन्यथा कलम २१ मधील तरतुदी अन्वये व महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ चे कलम आठ (कलम २१ (एक) सुधारणा नुसार प्रती वृक्ष एक लाख प्रमाणे दंडाची आकारणी करण्यात येईल त्यासह वीज कंपनीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा लागेल यांची गंभीर नोंद घ्यावी.