रेठरे बुद्रुक : गत काही दिवसांपासून वातावरणामध्ये अचानक बदल होत आहे. कधी कडक ऊन तर कधी अचानक आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरून येत आहे. मात्र, एवढे होऊनही पाऊस पडत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अशातच विहीर व कूपनलिकांची पाणी पातळी घटल्याने पाणीपुरवठा संस्थेचे पाणी शेतीला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये हमरीतुमरी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पावसाने दडी मारल्याने अन् उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली असल्यामुळे खरीप हंगामातील बरीचशी पिके कोमेजली आहेत. भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाऊस चांगल्याप्रकारे झाला होता. त्यादरम्यान बहुतांशी शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागती, बी-बियाणे खरेदी करणे, पेरणी करणे अशी कामे करण्यासाठी बराचसा खर्च करून पिकांची पेरणी, टोकणी, लागण अशी कामे पूर्ण केली. सुरुवातीला एक-दोन पाऊस देखील चांगल्याप्रकारे झाले अन् शेतकरी शेतीच्या कामात मग्न राहिला. पिकांची उगवण चांगल्याप्रकारे झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करून पिकांना खतांचे डोस दिले. दरम्यान, पाऊस पडत नसला तरी चिंता न करता पुन्हा एकदा पाऊस पडेल या आशेवर शेतीची कामे करत पावसाची प्रतीक्षा सुरूच होती. परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या परिस्थितीमध्ये कृष्णाकाठ तसेच परिसरामध्ये हंगामाच्या सुरुवातीचा पाऊस तसेच इतर स्त्रोतांपासून पाणी उपलब्ध करून लावलेली पिके आता भरण्याची वेळ आली आहे. परंतु वातावरणामध्ये अचानक होणारे बदल कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे उगवण झालेल्या पिकांना पाण्याची नितांत अवश्यकता आहे. ज्या परिसरात विविध स्त्रोतांचे पाणी उपलब्ध आहे. तेथेही अपुरा वीजपुरवठा तसेच पाण्याची वाढती मागणी, यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. अनेक ठिकाणी रात्री पाणी मिळविण्याच्या प्रयत्नात शेजार-शेजाऱ्यांची हमरीतुमरी देखील होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. (वार्ताहर) कऱ्हाड दक्षिणेतील तलावात ठणठणाट पावसाळ्याचा कालावधी संपत आला तरी पाऊस गायबच असल्याने उंडाळे परिसरासह सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी अपेक्षित वाढ नसलेली खरीप पिके उन्हाच्या तीव्रतेने कोमेजून जात आहेत. संभाव्य नुकसानाच्या भीतीने बळीराजा पुरता हबकला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी सध्या खालावत असल्याने शिवारातील विहिरीसह गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईचे संभाव्य चित्र आ वासून उभे आहे.
पाण्यासाठी आता वादावादी!
By admin | Published: September 06, 2015 10:19 PM