कऱ्हाड : कऱ्हाड येथील विमानतळावर विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे यासाठी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण गेल्या वर्षभरापासून प्रयत्नरत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्र उभारण्यास महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने नुकतीच परवानगी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना हवाई वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून कऱ्हाडला विमानतळाची उभारणी झाली. मध्यवर्ती ठिकाण असल्याने कऱ्हाडच्या विमानतळावर राजकीय नेत्यांच्या विमानांचे लँडिंग आणि टेकऑफ अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. मध्यंतरीच्या काळात तत्कालीन मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांनी नाईट लँडिंगची अडचण लक्षात घेऊन यात भरपूर सुधारणा केल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर विमानतळ विस्तारीकरणालाच हात घातला आहे. तो जमीन अधिग्रहणाचा तिढा अजूनही संपूर्णपणे मिटलेला दिसत नाही एवढेच!
दरम्यान, कऱ्हाडच्या या विमानतळाचा वापर जास्त प्रमाणामध्ये व्हावा या हेतूने आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळावर उड्डाण प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्याच दृष्टिकोनातून पृथ्वीराज चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी ॲम्बिशन फ्लाईंग क्लब व बॉम्बे फ्लाइंग क्लब यांच्या पदाधिकाऱ्यांना कऱ्हाडात बोलावून प्रत्यक्ष विमानतळाची पाहणी केली होती. राज्य सरकारने सहकार्य केल्यास उत्तर प्रदेशातील अलिगढमधील केंद्र कऱ्हाडला स्थलांतरित करण्याचा शब्द ॲम्बिशन क्लबने त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना दिला असल्याचे सांगितले जात होते.
दरम्यान, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्याला नुकतेच यश आले आहे. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास रीतसर परवानगी दिली आहे. त्यामुळे कऱ्हाडला हे केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच त्याला मूर्त स्वरूप येईल. त्याची प्रतीक्षा कऱ्हाडकरांना लागली आहे.
चौकट
नव्या पायाभूत सुविधा उभ्या राहतील...
कऱ्हाड येथे प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यावर नव्या पायाभूत सुविधा उभ्या राहतील. परिसराचा विकास व्हायला यामुळे मदत होईल यात शंका नाही. शिवाय येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येणारे प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणात असणार; त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
चौकट
विद्यानगरीत अभ्यासक्रमाची भर...
कऱ्हाड हे पुण्यानंतरचे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. अपवाद वगळता सर्व प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. विमानोड्डाण प्रशिक्षण केंद्रामुळे येथे नव्या अभ्यासक्रमाची भर पडणार आहे. विद्यानगरी कऱ्हाडची मान यामुळे नक्कीच उंचावेल.
कोट
कऱ्हाडचा विमानतळ तसा जुनाच आहे; पण त्याचा वापर तितक्या मोठ्या प्रमाणात होत नव्हता. आता विमानोड्डाण प्रशिक्षण केंद्रास मान्यता मिळाल्याने पायाभूत सुविधांचा विकास होऊन उत्पन्नाचे स्रोत वाढतील.
- दीपक कपूर
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक
महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण
फोटो : कराडकऱ्हाड येथील याच विमानतळांवर आता विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे.