प्रमोद सुकरे- कराड पंचायत समितीचा भोंगळ कारभार सातत्याने चव्हाट्यावर येतोय. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐकायलाच कुणाला वेळ नाही; मग सोडवायचे तर दूरच. तिथे लोकांना मनमोकळं करायला एक तक्रारपेटी होती़ तीही सध्या गायब आहे़ आता तर महिला सदस्यांना आपल्या प्रश्नांना न्याय मिळत नाही म्हणून अश्रू ढाळत चक्क मासिक सभेत दाद मागायला लागतेय. त्यामुळे, ‘साहेब, तक्रारपेटी निवांत बसवा; पण आधी महिला सदस्यांच्या तक्रारी तरी मिटवा,’ असचं म्हणायची वेळ आलीय़ कऱ्हाडला राजकीय पंढरी म्हणून ओळखलं जातं़ दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणाचा आदर्श घालून दिलाय; पण त्याच पायघड्यावरून चालताना पंचायत समिती सदस्यांनाच कुठे ‘देव’ सापडेना झालाय़ तो हा ‘विठ्ठल’ बरवा... म्हणत, पंचायत समितीचा गाडा पुढे सरकतोय खरा; पण इथे कुणाला कुणाची ‘दया’ही येत नाही अन् त्यामुळे आता काम करण्यात ‘राम’पण राहिला नाही म्हणे !पंचायत समितीच्या सभागृहात राजकीय त्रांगडं आहे़ कोणाचं तरी ओझं कोणाच्या तरी खांद्यावर ठेवत सोयीची युतीच येथे पाहायला मिळतेय. काँग्रेसचे संख्याबळ जास्त असतानाही राष्ट्रवादीचा सभापती अन् अपक्षांचा उपसभापती इथे पाहायला मिळतोय़ तर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेतेपद असणाऱ्यांच्या हातात भाजपचं कमळ फुललेलं दिसतंय़ त्यामुळे ‘मूह मे राम और बगल मे़़़’ या पद्धतीने कोण शत्रू अन् कोण मित्र, हेच कळेनास झालंय. इथे सत्तेत कोण अन् सत्तेबाहेर कोण, हेच कधी-कधी समजत नाही़ नोकरीत नवीन असणाऱ्या तरुण अधिकाऱ्याच्या हातात हा कऱ्हाडचा ‘फड’ मिळालाय़ हर‘तरे’ने ते प्रशासनावर पकड बसविण्याचा प्रयत्न करत आहेत; पण गडी अजून ‘मुरलेला’ नाही़ केवळ पंचायत समितीतील राजकीय अस्थिरतेमुळे तो ‘तरलेला’ आहे एवढेच़ नाहीतर कऱ्हाडात काम करायचं सोपं नव्हं बरं ! पंचायत समितीच्या प्रवेश द्वारावरच तालुक्यातील जनतेचे प्रश्न मांडता यावेत म्हणून अनेक वर्षांपासून तक्रारपेटी होती; पण मोठ्या उंचीच्या या अधिकाऱ्यांनी ती पेटीच चार महिन्यांपूर्वी काढून टाकलीय़ अन् हो विचारल्यावर म्हणे, ‘त्याचं कुलूप गंजलं होतं म्हणून काढलीय़ बसवायची आहे; पण त्याला वेळ लागेल़’ आता त्यांना कधी वेळ मिळणार आहे ‘देव’ जाणे़ तक्रारपेटी फोडली तेव्हा त्यात ३० तक्रारी होत्या म्हणे! अन् कुलूप गंजल्याने ते फोडावे लागले. म्हणजे, त्या तक्रारी कधीच्या, कुणाच्या अन् आता त्याचं काय झालं, हे माहीतही नाही; पण हे कमी की काय म्हणून शुक्रवारच्या सभेत महिला सदस्यांवर आपल्या तक्रारींची तड लावली जात नाही म्हणून गहिवरण्याची वेळ आली; पण राजकारणात माहीर असणाऱ्या ‘त्या’ जोडगोळीनं वेळ मारून नेली. प्रश्नांची उत्तरे मिळालीच नाहीत़ त्यामुळे अनेक प्रश्नही अनुत्तरित राहतात़ पंचायत समिती सदस्यांचीच अशी ‘पंचाईत’ होत असेल, तिथे सर्वसामान्य जनतेची काय अवस्था असेल. याचा विचारच न केलेला बरा़ पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल, तर सामान्यांच्या तक्रारींचे काय ? इथल्याच तक्रारी संपत नसतील, तर नसत्या नव्या तक्रारी कशाला म्हणून तर तक्रारपेटी काढली नसेल ना ? तक्रारपेटीच काढण्यापेक्षा काही तक्रारीच होणार नाहीत, असे प्रशासन राबविण्याची खरंतर गरज आहे; पण हे लक्षात कोण घेतो़ तेव्हा ‘साहेब, तक्रारपेटी निवांत बसवा; पण आधी सदस्यांच्या तरी तक्रारी मिटवा म्हणजे झालं !’ ‘भाव’ वाढलाच नाहीअधिकारी दखल घेत नसल्याच्या कारणावरून एक ‘राजा’ मनाचा सदस्य दीड वर्षापूर्वी या सभागृहातून निषेध म्हणून मधूनच उठून गेला होता; पण त्याचे सोयरसुतक फारसे कोणी घेतले नाही़ शेवटी मोठ्या मनाने तो सदस्य पुन्हा सभागृहात येऊन बसू लागलाय. राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या सदस्यांचा ‘भाव’ तरीही सभागृहात वाढलेला दिसत नाही़ मग नवख्या अन् महिला सदस्यांची कोण किती दाद घेणार? हाच खरा प्रश्न आहे.
भरसभेत आता झाली का ‘पंचाईत’!
By admin | Published: February 01, 2015 10:32 PM