सातारा : दिवसेंदिवस महागाईच्या झळा सर्वांनाच बसू लागल्या आहेत. प्रत्येक वस्तूंचे भाव वाढू लागले आहेत. अशा या महागाईत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांनीही ‘भाव’ खाल्ला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना श्रीखंड, आम्रखंड, पेढे, बर्फी असे गोड पदार्थही ‘तिखट’ वाटू लागले आहेत. त्यामुळे महागाईच्या झळांची तीव्रता आता वाढू लागल्याचे दिसत आहे. महागाई ही नेहमीच होत असते. या समस्येला सर्वांनाचा तोंड द्यावे लागत असते. अधिक करून सर्वसामान्यांना या महागाईचा प्रचंड सामना करावा लागतो. हे एका दिवसाचे चित्र नाहीतर वर्षानुवर्षाचे आहे. महागाईमुळे सामान्यांना खूप यातना सहन कराव्या लागतात. कधीकधी एकवेळ हातातोंडाची गाठ पडणे अवघड असते. अशावेळी चांगले पदार्थ, वस्तूंचा विचार करणे दूरच राहते. सध्याच्या या महागाईत दुग्धजन्य पदार्थांनीही ‘भाव’ खाल्ला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हे पदार्थ खाणे मुश्कील झालेले आहे. कारण दुग्धजन्य पदार्थांचे दर हे वाढलेलेच पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे बहुतांशी गोड असणारे हे दुग्धजन्य पदार्थ आता सर्वसमान्यांना तिखट ठरू लागले आहेत. दुग्धजन्य पदार्थात दूध, दही, ताक, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, बासुंदी, खवा, पेढे, बर्फी आदींचा समावेश होतो. तसेच दुधापासून इतर अनेक उपपदार्थही बनविण्यात येतात. मैद्यानंतर सर्वात जास्त उपपदार्थ हे दुधापासूनच तयार होतात. त्यामुळे दुधाला व इतर पदार्थांनाही मागणी असते. सर्वच घरात दूध हे दररोज आवश्यक असते. चहापासून खाण्यापर्यंत दूध घरात लागते. तसेच याच दुधापासून अनेक पदार्थ तयार होतात. त्यासाठी दूध हा घटक महत्त्वपूर्ण समजला जातो. सध्या याच दुधाचे भाव वाढलेले आहेत. एक जुलैपासून म्हशीच्या दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर गाईच्या दुधाच्या दरात एक ते दोन रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे आपोआपच इतर दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही वाढ झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्याचा दुधाचा विचार केला तर संघानुसार दर आकारण्यात येतात. सातारा जिल्ह्यात आज सुमारे २५ विविध दूध संघाचे दूध उपलब्ध होत आहे. त्यापैकी सातारा शहरात किमान २२ संघाचे दूध येत आहे. म्हशीच्या दुधाचा लिटरचा दर ४५ ते ४८ रुपयांच्या दरम्यान आहे. तर गायीच्या दुधाचा दर ३२ ते ३४ रुपयांच्या दरम्यान आहे. अशीच परिस्थिती दुग्धजन्य पदार्थांची आहे. श्रीखंडाचे दरही वाढले आहेत. आम्रखंड, खवा, बासुंदी यांचेही दर गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले आहेत. यामुळे आठवड्यातून किमान एकदा घरात स्वीट खाणारेही आता गोडपदार्थांपासून काहीसे दूर गेल्यासारखे दिसू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची बाब तर दूरच राहत आहे. कारण, दूध खरेदी करणेच सर्वसामान्यांना अवघड झाले आहे. तिथे श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी अशा पदार्थांची चव चाखणे दूरच राहिले आहे. महागाईच्या या स्थितीत सर्वच वस्तू, पदार्थांचे दर वाढले आहेत. यामधून कोणीही सुटला नाही. महागाईच्या या झळात दुधानेही ‘भाव’ खाल्ला आहे. (प्रतिनिधी) दुधाचे दर कमी... फक्त शेतकऱ्यांसाठी...दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांत दरवर्षी वाढ होत असते. दरवर्षी ही वाढ सरासरी १० ते १५ टक्क्यांपर्यंत असते. ही वाढ ग्राहकांसाठी असते. मात्र, शेतकऱ्यांना त्याचा फायदा फारसा होताना दिसून येत नाही. कारण, कधीतरी अपवादाने दुधाचे दर कमी झाले तर शेतकऱ्यांसाठी ते दर असतात. ग्राहकांना आहे त्याच दराने दूध खरेदी करावे लागते, असा अनुभव असल्याचे सांगण्यात येत आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे भाव वाढल्यानंतर खरेदीवरही परिणाम होत असतो. गिऱ्हाईकांना सत्य परिस्थिती सांगावी लागते. दर अधिक वाढल्यास ग्राहक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करतो. त्याचाही फटका दुकानदारांना बसतो. - किरण जाधव, सातारा
दुधातही आता ‘महागाईचा खडा’
By admin | Published: August 24, 2016 10:41 PM