सागर गुजर ल्ल सातारा विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माण-खटावचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार जयकुमार गोरे यांच्यातील विळ्या-भोपळ्याची लढाई सर्वज्ञात आहे. दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत गोरेंना पाडण्यासाठी याच ‘फलटण’करांनी चंग बांधला होता. आता, विधानपरिषदेच्या निवडणुकीत रामराजेंना ‘डिस्टर्ब’ करण्यासाठी हेच गोरे सरसावले असून श्रेष्ठींजवळ आपली नाराजी व्यक्त करुन राष्ट्रवादीला धडा शिकविण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या दोघांतील संघर्षाचे द्वंद्व गेल्या काही काळापासून अनेकदा उफाळून आलेले आहे. विधानसभा निवडणूक, जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक, श्रीराम कारखान्याची निवडणूक व त्यानंतर जिल्हा बँकेपुढे गोरेंनी केलेले उपोषण तसेच नुकतीच पार पडलेली लोणंद नगरपंचायतीची निवडणूक, या सर्व घटनांमध्ये गोरेंच्या रडारवर रामराजे होते, तर रामराजेंच्या निशाण्यावर नेहमीच गोरे राहिले. राजकीय वादावादीचा हा सिलसिला कायमच रंगला. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. आता पुन्हा एकदा रामराजेंना विरोध करण्यासाठी गोरेंना विधानपरिषदेच्या निवडणुकीचा मुद्दा मिळाला आहे. विधानपरिषदेतील १0 जागांसाठी १0 जून रोजी मतदान होणार आहे. ३१ मेपर्यंत अर्ज भरायचे आहेत. याआधी १0 पैकी तीन जागांवर राष्ट्रवादी-काँगे्रसचे प्राबल्य होते. या निवडणुकीतही राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन पक्षांची आघाडी होणार असल्याची चिन्हे आहेत, मात्र ३ जागांपैकी २ जागांवर काँगे्रसने दावा केला आहे. तर राष्ट्रवादीला केवळ १ जागा देण्याची तयारी काँगे्रसने दाखविली आहे. मुदत संपणाऱ्या १0 जागांपैकी २ राष्ट्रवादीच्या पारड्यात होत्या. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व धनंजय मुंडे हे दोन राष्ट्रवादीचे आमदार विधानपरिषदेत होते; परंतु एकालाच संधी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. वरिष्ठ पातळीवरील या घडामोडींमध्ये आपला डाव साधण्यासाठी आमदार जयकुमार गोरे सरसावले आहेत. रामराजेंवर कुरघोडी करण्यासाठी ते पक्षात आपले ‘वजन’ वापरण्याच्या तयारीला लागले आहेत. काँगे्रस पक्षामध्ये गोरेंच्या शब्दाला असणारे महत्त्व लक्षात घेता काँगे्रस पक्षश्रेष्ठी वेगळा निर्णय घेऊ शकतात. राष्ट्रवादीबरोबर घासाघीस करुन काँगे्रस दोन जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी हटवादी भूमिकेत राहिल्यास राष्ट्रवादीला धनंजय मुंडे किंवा रामराजे नाईक-निंबाळकर या दोघांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. धनंजय मुंडे हे विधानपरिषदेतील राष्ट्रवादीची तोफ आहेत. तर रामराजे हे अनुभवी सदस्य आहेत, यापैकी दोघांची निवड करण्याची वेळ आल्यास राष्ट्रवादी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. काँगे्रस विधानसभा आमदारांची मोट! विधानसभेत काँगे्रसचे ४२ आमदार आहेत. तर राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या ४१ इतकी आहे. या आमदारांना विधानपरिषदेसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना मतदान करता येते. आमदार जयकुमार गोरे हे काँगे्रसच्या ४२ आमदारांची मोट बांधण्यासाठी सरसावले आहेत. आता त्यांना कितपत यश येतेय, ते येणाऱ्या काळातच समोर येऊ शकणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती करु नये, असे माझे व्यक्तिगत मत आहे. युती केली तर माझा त्याला विरोध राहिल, याबाबत मी लवकरच श्रेष्ठींशी बोलून माझी नाराजी व्यक्त करणार आहे. - जयकुमार गोरे, आमदार, काँगे्रस
रामराजेंचा पत्ता कट करण्यासाठी याभाऊंची आता नवी राजनीती !
By admin | Published: May 14, 2016 11:44 PM