कोरेगाव : दफ्तरदिरंगाई व जुनी यंत्र प्रणाली यामुळे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पेन्शन मिळण्यास उशीर होत होता. मात्र, नव्याने दाखल झालेल्या तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी स्टेट बँकेच्या माध्यमातून एका क्लिकवर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पेन्शन जमा करण्याचा पायंडा पाडला आहे. जानेवारी महिन्यातील ३० लाख ८६ हजार ९५६ रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमाही झाले आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून यापूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पेन्शन जमा होत होती. त्यासाठी तहसील कार्यालय धनादेश देत होते. तो क्लिअर झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत असे. त्यासाठी किमान चार दिवस लागत होते. बँकेला या प्रक्रियेतून तब्बल तीन टक्के कमिशन मिळत होते. दरमहा पेन्शनसाठी लाभार्थी बँकेच्या शाखेत आणि तहसील कार्यालयात हेलपाटे मारत असत. तहसीलदार कट्यारे यांनी संक्रांतीदिवशी कोरेगावातील पदभार स्वीकारला. त्यांनी कार्यालयातील कारभार गतिमान करत असताना आधुनिक प्रणालीचा अंगिकार केला. कार्यालयात येणाऱ्या लाभार्थ्यांची चौकशी केल्यावर त्यांना पेन्शनमधील द्रविडी प्राणायम लक्षात आला. त्यांनी नायब तहसीलदार रवींद्र रांजणे व राजेंद्र देगावकर यांच्याशी चर्चा केली आणि भारतीय स्टेट बँकेद्वारे आर. टी. जी. एस. प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करणे कसे योग्य होईल, याची माहिती दिली. त्याकरिता जिल्हा बँकेकडून लाभार्थींची यादी १३ अंकी खाते क्रमांकासह मागविण्यात आली. त्यानंतर बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक यादव यांच्याशी चर्चा करुन नवीन प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी) महिन्याला ९२ हजार रुपये वाचणारपेन्शन जमा होण्याच्या प्रक्रियेत बँकेला तब्बल तीन टक्के कमिशन मिळत होते. जानेवारी महिन्यातील ३० लाख ८६ हजार ९५६ रुपये आता लाभार्थ्यांच्या खात्यावर एका क्लिकवर जमा झाले आहेत. या प्रणालीचा अंगिकार केल्याने शासनाचे एका महिन्याचे ९२ हजार ६०९ रुपये वाचले आहेत.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना या प्रोजेक्टचे सादरीकरण करण्यात आले आहे. त्यांना प्रोजेक्ट आवडला असून अन्य तालुक्यात ही योजना सुरु होण्याच्या मार्गावर आहे. - रवींद्र रांजणे, नायब तहसीलदार (महसूल)