दत्ता यादव --सातारा --निधी उपलब्ध होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठ्यांची कामे करण्यास प्राधिकरणने नकार दिला असून आजपर्यंतची गचाळ कामे दुरूस्त करण्याचा विडा यापुढे पालिकेलाच उचलावा लागणार असल्याचा गौप्यस्फोट मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पालिका अधिकाऱ्यांनीच यापुढे पालिका स्वत: कामे करणार असल्याचे सांगितले आहे, असे स्पष्टीकरण जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता व्ही. एल. कुलकर्णी यांनी दिले.गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जीवनप्राधिकरणच्या नावाने लोकप्रतिनिधींपासून नगरसेवकापर्यंत सगळ्यांनीच खडे फोडले. कामाची संथगती आणि निकृष्ठ दर्जा, असा आरोपही वारंवार प्राधिकरणवर झाला. वर्षभर शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली होती. सुधारीत पाणी पुरवठा योजना दीड वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा ठराव झाला होता. मात्र प्राधिकरणने या योजनेसाठी तब्बल पाच वर्षे लावली. परंतु अद्यापही या योजनेची कामे अपूर्ण आहेत, असा पालिकेचा आरोप आहे. वर्षभरापूर्वी प्राधिकरणने कामे करण्यास नकार दिल्याने त्या दिवसांपासून शहरातील सर्व पाईपलाईनची कामे पालिकाच करत असल्याचे बापट यांनी सांगितले. प्राधिकरणने अर्धवट कामे सोडल्यामुळे तब्बल साडेसात कोटी वाढीव खर्च झाला असल्याचा गौप्यस्फोटही संबंधितांनी केला.दरम्यान, सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामाची ८ कोटी थकबाकी पालिकेकडून यायची आहे. या योजनेचे काम करत असताना निधीची कमतरता भासत होती. त्यामुळे ठेकेदारांनी कामे बंद केली. साहजिकच ही योजना रखडली गेली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत यापुढील कामे पालिकाच करण्याचा निर्णय झाला असल्याची माहितीही अभियंता कुलकर्णी यांनी दिली.पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट आणि प्राधिकरणचे कुलकर्णी यांनी परस्पर विधाने केल्यामुळे या योजनेमध्ये नेमका गोलमाल काय, हे सातारकरांच्या समजण्यापलिकडे आहे.
‘प्राधिकरण’चे खड्डे आता पालिकेच्या उरावर!
By admin | Published: May 07, 2016 12:09 AM