संदीप कुंभार ।मायणी : मायणी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. वाढत्या चोºया रोखण्यासाठी परिसरातील ग्रामपंचायती व ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलीस विभागामार्फत गुरुवारपासून भोंग्याचा (सायरन) वापर सुरू करण्यात आला. यामुळे या परिसरात चोरांवर नक्कीच आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या कल्पनेतून मायणी पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गोसावी यांनी जिल्ह्यातील पहिला प्रयोग मायणी पोलीस दूरक्षेत्रंतर्गत राबवला आहे. यामध्ये मायणी पोलीस दूरक्षेत्रामध्ये येणाºया गावांमधील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून भोंगा खरेदी केले आहेत.
मायणी परिसरातील प्रत्येक गावांमध्ये ठराविक ठिकाणी भोंगा बसवण्यात येणार आहे. रात्रीमध्ये तीन ते चार वेळा तसेच रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती किंवा चोर आल्याची माहिती मिळाल्यानंतर हा भोंगा वाजवला जाणार आहे. यामुळे प्रत्येक गावातील ग्रामस्थ सावध राहतील. परिसरामध्ये चोरांना व चोरीला आळा बसावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
हा भोंगा गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरी बसवण्यात येणार असून चोर आल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी फोन करणे अपेक्षित आहे. मायणी पोलीस दूरक्षेत्रात याचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस पाटील प्रशांत कोळी, भरत देशमुख, धनाजी गारळे, बाबूराव पवार, सरपंच संगीता घाडगे, उपसरपंच हनुमंत भोसले, विक्रम पवार, उमेश मदने, शंकर पाटील, अरुण खैरमोडे, रवींद्र देशमुख, गुलाब दोलताडे, बापूराव खांडेकर, नवनाथ शिरकुळे, प्रकाश कोळी उपस्थित होते.प्रतिष्ठितांच्या घरात भोंगा..गावातील प्रतिष्ठित व जागरूक व्यक्तीच्या घरामध्ये भोंगा लावण्यात येणार आहे. त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर गावातील व वाड्या-वस्त्यांवर राहणा-या ग्रामस्थांना दिला जाणार आहे. चोर आल्याची माहिती मिळताच त्या कुटुंबाला किंवा त्या व्यक्तीला फोन केल्यानंतर सदर व्यक्ती हा भोंगा वाजवणार आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या कल्पनेतून मायणी विभागातील सर्व गावांमध्ये भोंगा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्र गस्तीमध्ये सातत्य राहत नाही. तसेच गावांमध्ये किंवा परिसरामध्ये चोर आले तर सगळ्यांना सांगणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेतला आहे. यामुळे परिसरातील चोºया कमी होतील.- शहाजी गोसावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक
मायणी दूरक्षेत्र हद्दीतील गावांमध्ये चोऱ्या रोखण्यासाठी भोंगा बसविण्यात येत आहेत.