सातारा : भविष्यात पाणी विकत घ्यावे लागेल असे एखाद्याने म्हटले, तर लोक त्याला वेड्यात काढायचे. एवढे मुबलक पाणी आणि ते कशाला विकत घ्यायचे, असे म्हटले जायचे. पण, तेच पाणी आपण स्वखुशीने विकत घेऊ लागलो. तशीच परिस्थिती आता ऑक्सिजनची झाली आहे. मुबलक प्रमाणात असलेल्या ऑक्सिजनची किंमत कधीच कळली नाही. पण, आता रुग्णालयात ऑक्सिजन विकत घ्यावा लागत असल्याने ऑक्सिजनची किती गरज आहे याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनही विकत घेऊनच फिरावे लागेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता डॉक्टर व्यक्त करत आहेत.
पाणी आणि ऑक्सिजन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ऑक्सिजनपासून पाणी तयार करायचे आणि पाण्यापासून ऑक्सिजन वेगळा करायचा. वातावरणात या दोन्ही गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. पण, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा याची आता वानवा निर्माण झाली आहे. शुद्ध पाणी मिळत नसल्याने सध्या उपलब्ध असलेले पाणी शुद्ध करून ते विकत घ्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचीही उणीव भासू लागली आहे. जेव्हा ऑक्सिजनशिवाय जीव कासावीस होतो, त्याचवेळी ऑक्सिजनची किंमत कळते. कोरोना झालेल्या अनेक रुग्णांना सध्या ऑक्सिजनची किती आवश्यकता आहे, याची जाणीव होऊ लागली आहे. त्यांना दर दिवसाला ८ ते ९ किलो ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे. असा ऑक्सिजन एकवेळ विकत घेता येईल, पण तो ज्या उपचार पद्धतीने स्वीकारावयाचा आहे, तो शरीरात घेण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहे. कधी कधी तर हा ऑक्सिजन उपलब्धच न झाल्यामुळे जीव कासावीसही होत आहे. ऑक्सिजनमुळे लोकांचा जीव जाण्याचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत रुग्ण बरा झाल्यानंतर, किमान एक तरी झाड लावा, असा उल्लेख डॉक्टरही औषधांच्या चिठ्ठीवर आवर्जून करत आहेत.
चौकट
पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक
पर्यावरणाचा समतोल राखला गेला नाही, तर अनेक गोष्टी चिंताजनक ठरू शकतात. दिवसेंदिवस कमी होणारी जंगले आणि पाणवठे यामुळे नैसर्गिक स्त्रोत बंद होत चालले आहेत. नैसर्गिक हवेमुळे अनेकदा बाह्य जीवाणूंचा कमी उपद्रव होतो. जर हवा कोंदट बनत असेल, तर त्याठिकाणी जीवाणू तयार होतात. यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे.
स्वच्छता आणि कचरा निर्मूलनाला प्राधान्य हवे
शहरांमध्ये कमालीची अस्वच्छता पाहायला मिळते. त्यामुळे अनेक आजारांनाही निमंत्रण दिले जाते. आजारांपासून दूर राहायचे असेल तर त्यासाठी स्वच्छतेला महत्त्व दिले पाहिजे. त्याबरोबरच शहरात होणारा कचरा उचलणे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणे यासाठीही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. भविष्यात या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.