सातारा : संपूर्ण राज्यासह सातारा जिल्ह्यातही आवर्षणग्रस्त स्थिती निर्माण झाली असल्याने पाणी वापरावर निर्बंध आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जलतरण तलावातील पाणी पोहल्यानंतर अशुद्ध होते. पर्यायाने हेच पाणी नाल्यात सोडून द्यावे लागते. आता हेच पाणी दुष्काळग्रस्तांच्या मुखात जाणार आहे.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी २२ मार्च रोजी जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा क्रीडाधिकारी यांना जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश काढले. या आदेशानुसार सरकारी मालकीसह खासगी जलतरण तलाव १ एप्रिलपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. ही कार्यवाही काटेकोरपणे अमलात आणण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २२ मार्चनंतर होळी, धुळवड व रंगपंचमी असे सण सलगपणे होते. या सणांमध्ये पाण्याचा अनिर्बंध वापर केला जातो. सध्याची भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, पाणी वाया घालविणे धोक्याचे बनले आहे. पाऊसच कमी प्रमाणात झाल्याने तलावांतील पाणी आटलेले आहे. जलयुक्त शिवार योजनेमध्ये तलावांची कामे झाली असली तरी त्यात पाणी साठायला आॅगस्ट महिना उजडावा लागणार आहे. एप्रिल, मे महिन्यात एखादा जोरदार वळवाचा पाऊस झाला तर हे तलाव भरतील. मात्र, ही बाब अद्याप तरी स्वप्नवत अशीच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे महत्त्व लक्षात येण्यासारखे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जून महिन्यात जोरदार पाऊस होईल, याचा अंदाज घेऊनच आदेश काढले आहेत. (प्रतिनिधी)६ कोटी लिटर पाणी वाचेलसातारा जिल्ह्यामध्ये ११ तालुके आहेत. या तालुक्यांत प्रत्येकी सरासरी तीन जलतरण तलाव आहेत. यांची संख्या होते ३३. एका जलतरण तलावासाठी साधारणपणे २२ लाख लिटर इतके पाणी रोज लागते. जलतरण तलाव बंद ठेवल्यास अंदाजे ६ कोटी ६ लाख लिटर पाणी बचत होऊ शकते. ‘लोकमत’च्या आवाहनाला यश‘लोकमत’ने कोरडी रंगपंचमी खेळण्याचे आवाहन केले होते. याला प्रत्येक ठिकाणी यश आले. बहुसंख्य तरुण मंडळांनी पुढाकार घेऊन कोरडी रंगपंचमी खेळली. जलतरण तलाव बंद ठेवल्यास जलतरणप्रेमींची थोडी गैरसोय होणार असली तरी पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांचा विचार करणे आवश्यक ठरत आहे.. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी पाणी बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी आम्हाला पत्र दिले होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जलतरण तलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या तलावांसाठी लागणारे पाणी लोकांना पिण्यासाठी पुरविले जाणार आहे. राज्य शासनाच्या जलजागृती सप्ताह योजनेचाच हा निर्णय एक भाग आहे. या आदेशाचा परिणाम थोड्याच दिवसांत पुढे दिसून येईल.- अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी
आता पाणी नाल्यात नाही... मुखात!
By admin | Published: March 30, 2016 10:16 PM