कोरेगाव : ‘साताऱ्यातून राष्टवादी काँग्रेस पक्षाचा खासदार पाच वर्षांसाठी निवडून दिला होता. त्याने पावणेपाच वर्षे शिल्लक असताना राजीनामा दिला आहे. ज्यांना निवडून दिले, त्यांनी चुकीचे काम केले आहे. ते आता आपल्याला ठरवायचं आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांचा नामोल्लेख टाळून केली.
कोरेगावमध्ये शुक्रवारी राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बाजार समिती आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीनिवास पाटील, सातारा-जावळीचे उमेदवार दीपक पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, ‘त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने आता पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी सरकारचे २२ ते २५ कोटी रुपये खर्च होतात, ही रक्कम सरकार खर्च करत असले तरी सरकारकडे ही रक्कम सामान्य जनतेकडूनच जमा होते. त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांनी राजीनामा देऊन जे चुकीचे काम केले आहे, ते दुरुस्त करण्याची वेळ आली आहे.’
‘राज्यात ज्यांच्याकडे आपण सत्ता सोपविली त्यांनी सर्वसामान्यांचे हित कधीच पाहिलेच नाही. शेतकरी आत्महत्यांकडे पाहण्यास सरकारकडे वेळ नाही. मात्र नेतेमंडळींच्या वित्तीय संस्थांना हातभार लावण्यास ते मागे-पुढे पाहत नाहीत, हे दुर्दैव आहे. त्यामुळे राज्यातील सरकार उलथवून टाकण्यासाठी आता तरुणांनीच निवडणूक हाती घ्यायची वेळ आली आहे,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.
श्रीनिवास पाटील व शशिकांत शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यांनी आजवर सामान्य जनतेसाठीच विकासाभिमुख काम केले आहे. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा लोकसभा आणि विधानसभेमध्ये उमटवला आहे. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊनच संधी दिली असल्याचे त्यांनी नमूद केले.