सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. दोनच दिवसांत जिल्ह्यात तब्बल २ हजार ९७७ नवे रुग्ण आढळून आले असून, ७१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधित व मृतांचे प्रमाण वाढू लागल्याने सातारकरांची अक्षरश: झोप उडाली आहे. दरम्यान, संचारबंदी असूनही गर्दीने गजबजणारी येथील बाजारपेठही रविवारी नि:शब्द झाली.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आरोग्य यंत्रणा जीवतोड मेहनत घेत आहेत. तरीही जिल्ह्यात कोरोनाचे अक्षरश: थैमान सुरू आहे. सोमवार, १२ पासून जिल्ह्यात दररोज एक हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागल्याने प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या सात दिवसांत जिल्ह्यात ८७६२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दोनच दिवसांत २९७७ रुग्ण आढळून आल्याने व ७१ बाधितांचा मृत्यू झाल्याने सातारकरांची झोपच उडाली आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे, असे असतानाही साताऱ्यात नागरिक व वाहनधारकांचा मुक्त संचार सुरू होता. कारवाई करूनही बाजारपेठेतील गर्दी काही कमी होत नव्हती. मात्र, गेल्या दोन दिवसांतील बाधित व मृतांचा आकडा पाहून सातारकर हबकले आहेत. रविवारी बाजारपेठेतील गर्दी पूर्णत: ओसरल्याने नागरिकांनी कोरोनाची भलतीच धास्ती घेतल्याचे दिसून आले.
(पॉईंटर)
(जिल्ह्याची कोरोना स्थिती)
एकूण नमुने ४,७४,६७३
एकूण बाधित ८१,७९६
घरी सोडण्यात आलेले ६६,६०६
मृत्यू २,११४
उपचारार्थ रुग्ण १३,०७६
----------------
(चौकट)
भाजीमंडई बंद
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा व पालिका प्रशासनाकडून आठवडा बाजार व मंडई बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारी महात्मा फुले भाजी मंडईसह ठिकठिकाणच्या मंडईत शुकशुकाट पसरला होता. रस्त्यावर भाजी विक्री करण्यासही बंदी घालण्यात आल्याने भाजीविक्रेत्यांनी गजबजणारे रस्ते ओस पडले होते. शहरात फिरून भाजीविक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे.
(चौकट)
कडेकोट पोलीस बंदोबस्त
बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी दिवसभर दुचाकीवरून फिरणाऱ्यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. केवळ आरोग्यसेवेसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून सूट देण्यात आली. काही वाहनधारकांवर कारवाई देखील करण्यात आली.
फोटो : १८ जावेद खान ०१/०२/०३