लोकमत न्यूज नेटवर्क
कराड : कोरोना संकटात बाधितांची संख्या खूप मोठी आहे. कराड तालुक्यातही बाधितांचा आकडा धडकी भरविणारा आहे. अशा परिस्थितीत कऱ्हाडात हजारावर बेड संख्या कागदावर असताना बाधितांना मात्र बेड मिळत नाही. त्यामुळे कोरोना जिवावर उठल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.
कराड शहर व तालुक्यात सुमारे सतरा ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार केले जातात. त्यात साखर कारखान्यांनी उभारलेल्या कोरोना केअर सेंटरचाही समावेश आहे. त्यामुळे कराड तालुक्यात आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व इतर बेडची संख्या १ हजार ३४० पर्यंत जाते.
पण प्रत्यक्षात बाधितांची व त्यांच्या नातेवाइकांची होणारी परवड पाहिली की, बेडची संख्या कागदावरच आहे का, असा प्रश्न पडतो. लाॅकडाऊनमुळे आज प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. परिणामी प्रत्येकालाच आपल्या रुग्णाचा उपचार हा शासकीय खर्चातून व्हावा अशी अपेक्षा आहे; पण तेथे बेड उपलब्ध करताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. तरीही यश किती मिळेल हे सांगता येत नाही.
कराडला कृष्णा हॉस्पिटल व उपजिल्हा रुग्णालयात पूर्णत: मोफत उपचार केले जात आहेत, तर इतर दोन खासगी रुग्णालयांत महात्मा फुले योजनेंतर्गत ८० टक्के बेड राखीव ठेवण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे कराडला खाजगी रुग्णालयातील बेडपेक्षा शासकीय व आरोग्य योजनेतून उपचार देणारे बेड कागदावर तरी मोठ्या संख्येने दिसतात; पण प्रत्यक्षात गरजूंना किती बेड उपलब्ध होतात हा संशोधनाचा भाग बनला आहे.
कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात सुरू केलेल्या केअर सेंटरमध्ये ५० ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. शासकीय इमारत वापरात घेतल्याने येथे ऑक्सिजन बेडचा खर्च ५० टक्के आकारण्याचे प्रशासनाने निर्देश दिले आहेत, तर उंडाळे ग्रामीण रुग्णालय व वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी तीस ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली आहे; पण तेथे ऑक्सिजन बेड सुरू दिसत नाहीत.
चौकट
इतर तालुके, जिल्ह्याचाही ताण
कराड शहर सातारा व सांगली या दोन्ही जिल्ह्यांतील काही तालुक्यांना मध्यवर्ती ठरते. शिवाय कराडला वैद्यकीय सेवा देणारी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णांवर सध्या कराड तालुक्याबाहेरचा रुग्णांचा मोठा ताण दिसत आहे.
चौकट
कराडमधील बेडची स्थिती...
शासकीय व महात्मा फुले योजनेतील बेड
आयसीयू - ८४
ऑक्सिजन - ३३८
व्हेंटिलेटर - ३१
इतर - ५४२
एकूण ९९८
खाजगी रुग्णालयातील बेड
आयसीयू - ८८
ऑक्सिजन - २०१
व्हेंटिलेटर - २६
इतर - ३०
एकूण ३४५