कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क आहे, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता ऑक्सिजनयुक्त आणि साध्या बेडची संख्या वाढविणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांतच ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ९९ बेड तर चॅलेंज अॅकॅडमी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये १०० बेड वाढविले जाणार आहेत, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
पंचायत समिती सभागृहात सोमवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती सुनील साळुंखे, माजी सभापती संजय झंवर, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भस्मे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. राजन काळोखे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे व खातेप्रमुख उपस्थित होते.
कोरोनाविषयात कोणीही राजकारण करता कामा नये, कोरोनाला रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्रितपणे काम केले पाहिजे. उपजिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांना जे-जे आवश्यक साहित्य पाहिजे आहे, त्याची यादी व मागणीपत्र प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करावे.
शहरातील खाजगी रुग्णालयातील बेड अधिग्रहण करावेत, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा घेण्याबाबत चर्चा करावी, त्यांच्या अडचणी जाणून घ्या, मात्र गंभीर परिस्थिती पाहता शासकीय कोरोना केअर सेंटर्समध्ये खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना सेवा देण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी तत्काळ आदेश काढावेत. एकही रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
उपजिल्हा रुग्णालयात ९९ ऑक्सिजन बेडस् आणि चॅलेंज अॅकॅडमी येथे १०० बेडस् लवकरच कार्यान्वित केले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यकता भासल्यास आरोग्य मंत्र्यांशी बोलेन, जरुर तर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी बोलणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.
(चौकट)
रेमडेसिविर वितरणाबाबत दक्षता घ्या. तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेडची संख्या जास्त आहे, अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन्स देणे क्रमप्राप्त आहे. गेल्या चार दिवसांपासून एकही इंजेक्शन मिळालेले नाही, असे डॉ. गणेश होळ यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर आ. शिंदे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्याला संपर्क साधून प्रांताधिकाऱ्यांबरोबर समन्वय ठेवून आवश्यकतेनुसार इंजेक्शन्स पुरविण्याच्या सूचना दिल्या
फोटो : २० शशिकांत शिंदे
फोटो ओळ : कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत आ. शशिकांत शिंदे यांनी तालुक्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.