कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका रुग्णांना बसत आहे. गतवर्षीपेक्षा बाधित होण्याचे प्रमाण दुप्पट ते तिप्पट आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र, हॉस्पिटलमध्यो बेडची संख्या कमी असून, अनेक रुग्णांना बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. सध्या कोणत्याही हॉस्पिटलला संपर्क केला की, बेड शिल्लक नसल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांना सांगितले जात आहे. त्यामुळे काही रुग्णांचा घरीच उपचाराविना मृत्यू झाला आहे. सध्या जादा कोविड हॉस्पिटलची गरज आहे. याचा विचार करून प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये ५० बेडचे, तर लाइफ केअर हॉस्पिटलला २३ बेडच्या कोविड हॉस्पिटलची मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी बहुउद्देशीय हॉलमध्ये ५०, तर लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये २० ऑक्सिजन, तर ३ व्हेंटिलेटर बेडसाठी परवानगी दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ते रुग्णांच्या सेवेसाठी सुरू होतील, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.
कऱ्हाडला बेडची संख्या वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:41 AM