खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत गेला. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ हजारांच्या घरात पोहोचली आहे. परंतु लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर लोकांची गर्दी भलतीच वाढत असल्याने कोरोना पुन्हा पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एकीकडे रुग्ण संख्या घटत असताना वाढती गर्दी कोरोनाची धोक्याची घंटा मानली जात आहे.
सरकारच्या लॉकडाऊन नंतरही नियमांची पायमल्ली झाल्याने रुग्णांची संख्या तालुक्यात झपाट्याने वाढत गेली. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले. यापैकी सध्या केवळ दोनशे रुग्ण पॉझिटिव्ह असून, ते विविध ठिकाणी अद्यापही उपचार घेत आहेत. प्रशासनाच्या दक्ष कारभारानंतर गेल्या चार दिवसांत रुग्णसंख्या घटली असल्याने आरोग्य प्रशासनाला थोडी स्वस्थता मिळाली आहे. नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, यासाठी गावोगावी स्वतंत्र विलगीकरण कक्ष करून उपाययोजना केल्या. नियम काटेकोर करून कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले.
खंडाळा तालुक्यातील ६३ गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले असून, कोरोनाची एकूण संख्या १०,६३० पर्यंत पोहोचली आहे. तालुक्यातील २३१ कोरोना बाधितांपैकी शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ८६, लोणंद केंद्राअंतर्गत ८९ तर अहिरे केंद्रातंर्गत ५६ पॉझिटिव्ह संख्या आहे. तर गेल्या दोन दिवसांत बाधित संख्या कमी झाल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.
चौकट..
दक्षता पथकाची नेमणूक...
प्रत्येक जिल्हा परिषद गटात दक्षता पथक नेमले आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे, विलगीकरण कक्षातील सुविधांची पाहणी करून पूर्तता करणे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व लसीकरण यावर देखरेख ठेवणे, यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही पथके कार्यरत आहेत.
चौकट..
लहान मुलांची काळजी...
पुढील काळात तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून लहान मुलांची काळजी घेण्यासाठी ग्रामस्तरीय कमिटीमध्ये स्थानिक शिक्षकांचा समावेश करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. मुलांच्या संपर्कात राहून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्रास जाणवणाऱ्या मुलांना उपचार मिळवून देणे याकडे शासनाचा कटाक्ष आहे.
चौकट..
लसीकरणाचे प्रमाण कमी...
तालुक्यात खंडाळा ग्रामीण रुग्णालय, शिरवळ, अहिरे, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे. याद्वारे तालुक्यातील ३८,२३७ लोकांना पहिला डोस व ७,५५४ लोकांचा दुसरा डोस असे एकूण ४५,७९१ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. मात्र, हे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे लसीकरणाचा पुरवठा वाढवून प्रत्येक गावी शिबिर घेऊन लसीकरण व्हावे, अशी मागणी लोकांमधून होत आहे.
............... ..................................