सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून गत चोवीस तासात नवे १९१ रुग्ण आढळून आले असून यामध्ये एकाचा बळी गेला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ९०३ वर पोचला आहे तर बाधितांची संख्या ६५ हजार १५३ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषता गत आठवड्यापासून ही संख्या आणखीनच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. रोज तीनशेच्यावर बाधितांचे येणारे आकडे आता चारशेच्या वर जाऊ लागले आहेत. त्याचबरोबर अधून-मधून रुग्ण दगावत आहेत.
रविवारी ४७४ तर सोमवारी ४०७ असे एकूण ८८१ नवे रुग्ण आढळून आले होते. या दोन्ही अहवालामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. मात्र मंगळवारी आलेल्या १९१ जणांचा अहवाल हा तीन दिवसातील सर्वाधिक कमी आहे. त्यामुळे किंचितसा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून मृतामध्ये कोरेगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये सातारा, खटाव, फलटण आणि कराड तालुक्याचा समावेश आहे.
सातारा तालुक्यामध्ये सर्वाधिक ४६ नवे रुग्ण तर फलटण तालुक्यामध्ये ३३ आणि कराड तालुक्यामध्ये ३३ रुग्ण तसेच खटाव तालुक्यात २० नवे रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या ६५ हजार १५३ इतकी झाली आहे तर बळींचा आकडा १ हजार ९०३ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ५९ हजार ८४६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या ३ हजार ४०४ रुग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.