कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील तारूख येथे पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. हाॅटस्पाॅट बनलेल्या या परिसरातील साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना योद्धा म्हणून तळागाळात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, सरपंच आणि आरोग्य सेविकांसह संपूर्ण कुटुंब बाधित आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका कुटुंबातील अनेक सदस्य बाधित झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे ही कोरोना साखळी खंडित करणे हे प्रशासनासमोरील आव्हान आहे.
कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या तारूख येथील उपकेंद्र क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी सकाळी पंचवीस झाली आहे. दिवसागणिक बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चार बाधित रूग्णालयात उपचार घेत असून, २१ रूग्ण घरीच विलगीकरणात ठेवले आहेत. तारूख येथील आजपर्यंतची रूग्णसंख्या ११२ झाली असून, ८२ बाधित रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या रोखण्यासाठी नेटक्या नियोजनाची गरज आहे.
चौकट :
तारूख येथील आरोग्य उपकेंद्रातील प्रत्येक काम करणाऱ्या आरोग्यसेविकांसह कुटुंबातील अन्य पाच सदस्य बाधित आले आहेत. तर दोन अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील बाधित आले आहेत. सरपंचांच्या कुटुंबातील तीन सदस्य कोरोनाबाधित आले आहेत.
चौकट :
आरोग्यसेविका, अंगणवाडीही बाधित
तारूख येथील उपकेंद्रातील आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका बाधित आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी आशा सेविकांचा संप मिटला असल्याने आशा रूजू झाल्या असल्या तरी सध्या उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी विद्या राऊत ह्या एकच कर्मचारी कार्यरत असल्याने अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची कुमक वाढविणे गरजेचे आहे.
चौकट :
विलगीकरणात जाण्यास विरोध
तारूख येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असला तरी येथील एकवीस बाधित सध्या गृह अलगीकरणातील उपचार घेत आहेत. विलगीकरण कक्षात दाखल होण्यास विरोध दर्शवला जात असल्याने बाधितांची संख्या कमी करणे आरोग्य विभागासमोरील आव्हान आहे.