सातारा : जिल्ह्यात मंगळवारी ३१० नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, बाधितांची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे. मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नसल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती. सोमवारी १८५ रुग्ण आढळले होते. मंगळवारी त्यात वाढ होऊन बाधितांची संख्या ३१० वर जाऊन पोहोचली. ८ हजार ३६० चाचण्यांमधून हे रुग्ण आढळून आले आहेत. सातारा तालुक्यात रुग्णांची संख्या अचानकपणे वाढल्याचे चित्र आहे.
सातारा तालुक्यामध्ये सर्वाधिक ७६, त्याखालोखाल फलटणमध्ये ५५, जावलीत ५, कऱ्हाड ३०, खंडाळा २, खटाव ३८, कोरेगाव ३०, माण ३८, महाबळेश्वर ६, पाटण ५, वाई १५ व इतर १० असे आजअखेर एकूण २ लाख ४४ हजार ९९९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये आज संध्याकाळपर्यंत १ हजार ५४ जणांना घरी सोडण्यात आले असून ७ हजार ८१२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.