सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून, सोमवारी १८२ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांचा आकडा ५९ हजार ९१३वर पोहोचला आहे, तर एका बाधिताचा मृत्यू झाला. कोरोनाने आतापर्यंत एक हजार ८६४ जणांचा बळी गेला आहे.
जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्यानुसार १८२ नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. यामध्ये सातारा शहराबरोबरच तालुक्यातील पाटखळ, गोवे, दरे आदी गावांत नवीन रुग्ण स्पष्ट झाले आहेत. कऱ्हाड शहराबरोबरच तालुक्यातील गोवारे, गमेवाडी, येणपे, इंदोली, मलकापूर येथे तर पाटण तालुक्यातील केलोळी, चोपदारवाडी येथे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
फलटण शहराबरोबच तालुक्यात पाडेगाव, तरडगाव, तांबवे, जाधववाडी, मुंजवडी, शिंदेवाडी या गावांत तर खटाव तालुक्यात खटाव, वडूज, नेर, पळशी, वडगाव, एनकुळ, तडवळे या गावात रुग्ण समोर आले. त्याचबरोबर माण तालुक्यातील दहीवडी, गोंदवले, पळशी, सोकासन, शिंगणापूर, मार्डी, गोंदवले येथे तसेच कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव, पिंपरी, कुमठे, सातारारोड, रेवडी, देऊर, दुर्गळवाडी, सातारारोड, किरोली येथे कोरोनाचे नवीन रुग्ण स्पष्ट झाले आहेत तर वाई, खंडाळा, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातही नवीन रुग्ण वाढले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात सातारा तालुक्यातील नागठाणे येथील ७८ वर्षांच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
चौकट :
१८३ जण घरी; ३६२ संशयितांचे नमुने तपासणीला...
जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या १८३ नागरिकांना सोमवारी घरी सोडण्यात आले, तर ३६२ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या आता ५६ हजार २६२ झाली आहे.
...................................................