दहिवडी : मागील काही महिन्यांमध्ये घट झालेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. ही संख्या ६५४ इतकी झाली आहे. त्यातच महत्त्वाच्या कोरोना सेंटरसह गावोगावी सुरू झालेली कोरोना सेंटर बंद झाल्याने काही मोजक्याच कोरोना सेंटरवर ताण येऊ लागला आहे. गृह अलगीकरण हा प्रकार अचानक वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमुळे डोकेदुखी ठरु लागला आहे.
माण तालुक्यात दहिवडी, म्हसवड, पळशी, कुळकजाई, वारुगड, आंधळी, वडगाव, पांगरी, मार्डी, जाशी, शेवरी, धुळदेव, हिंगणी, गोंदवले बुद्रुक, सुरुपखानवाडी, जांभुळणी, पळसावडे, देवापूर, महाबळेश्वरवाडी व शेनवडी येथे दोन आकडी रुग्णसंख्या आहे. तालुक्यातील एकूण ९७ गावांमधील ६५४ कोरोनाबाधित उपचाराखाली आहेत. पळशीसारख्या गावात कोरोनाबाधितांची संख्या कायमच लक्षणीय राहिली आहे. अशा गावांनी एकावेळी हाॅटस्पाॅट व मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेल्या बिदाल गावाचा आदर्श घेण्याचा आवश्यकता आहे. बिदालमध्ये सध्या फक्त सहा कोरोनाबाधित आहेत. विलगीकरणाचे धोरण कडकपणे राबविल्यानंतर तिथे एकही मृत्यू झालेला नाही.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मायणी मेडिकल हाॅस्पिटल, जनसेवा सेंटर, म्हसवड ही महत्त्वाची सेंटर बंद आहेत. गावोगावी सुरू झालेली बहुतांशी सेंटर बंद आहेत. त्यामुळे आम्ही म्हसवडकर, चैतन्य गोंदवले बुद्रुक तसेच माणदेशी संचलित गोंदवले खुर्द या सेंटरवर मोठा ताण येत आहे. बहुतांशी रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची याच सेंटरना रुग्ण दाखल करण्याची धडपड असते. यावेळी नाईलाज असेल तरच ते रुग्णांना इतरत्र नेतात. आम्ही म्हसवडकर संचलित म्हसवड येथील सेंटरमध्ये शंभर बेड असताना तिथे तब्बल १७४ रुग्ण आहेत. तर दहिवडीत १०० - ५४ व नवचैतन्य, गोंदवले बुद्रुक येथे १०० - ७२ असे प्रमाण आहे. डीसीएचसीमधील ऑक्सिजन बेडचीही तशीच अवस्था आहे.
ऑक्सिजन बेड भरले
म्हसवड १५ १२
गोंदवले खुर्द २२ २५
दहिवडी ५० १५
चैतन्य गोंदवले बुद्रुक ३० १९
गलांडे हाॅस्पिटल, म्हसवड २५ ३ असे प्रमाण आहे.
उपचार घेणारे
३००
ऑक्सिजनवर
७४ रुग्ण
मास्कचा वापर करणे व शारीरिक अंतर ठेवणे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाऊ लागले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा कल गृह अलगीकरणाकडे वाढला आहे. अनेक प्रयत्न करुनही ठराविक ठिकाणच्या रुग्णांना कोरोना सेंटरपर्यंत नेणे प्रशासनाला शक्य होताना दिसत नाही. हलगर्जीपणामुळे पुन्हा कोरोना मोठ्या प्रमाणात डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौकट :
माणमधील कोरोनाची स्थिती
कोरोनाबाधित : १४९९०
बरे झालेले : १३९९६
उपचाराखाली : ६५४
मृत्यू : ३४०
रॅपिड टेस्ट
६५,३०२
आरटीपीसीआर
४३,११६