सागर चव्हाण ।पेट्री : भांबवली वजराई धबधबा आता पर्यटन विकासासाठी सुसज्ज होत आहे. धबधबा पाहण्यासाठीचा मनोरा व पॅगोडा तयार केला जात असून, याचे काम जोरात सुरू आहे. देशातील एक नंबरचा धबधबा पाहण्याचे थ्रिलिंग अनुभव घेता येणार आहे.
भांबवली, वजराई धबधब्याला ५ जानेवारी २०१८ रोजी ‘क’ वर्ग पर्यटन म्हणून जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. त्यानंतर धबधब्याच्या विकासाचे काम सुरू झाले. पहिल्या टप्प्यातील पायऱ्या व रेलिंगचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले. घनदाट जंगल व दुर्गम डोंगरातून जाताना पर्यटकांना कराव्या लागणाºया घसरगुंडीची गैरसोय दूर झाली आहे.
दुस-या टप्प्यातील दर्शन मनोरा व पॅगोडाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. यावर्षीच्या मौसमात धबधब्याचा प्रचंड पाण्याच्या प्रपाताचा आनंद हा मनोरा व व पॅगोडातून पाहायला मिळणार आहे. पर्यटकांना पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी भांबवली ही आगामी काळात पर्वणीच ठरणार आहे. निसर्गाचा अमूल्य ठेवा असलेला हा परिसर पर्यटन विकासामुळे खुलायला लागला आहे.
तिस-या टप्प्यात पर्यटकांना राहण्यासाठी बांबूंच्या घरांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी १८ लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीने वितरित केला आहे. लवकरच गेस्ट हाऊसचे काम सुरू होऊन पूर्णत्वास जाईल व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या २१ जानेवारी २०२० च्या मीटिंगमध्ये भांबवली वजराई धबधब्याच्या विकासासाठी सौरदिवे, तिकीटगृह, बाकडे, स्वच्छतागृह, पायवाट, वॉटर एटीएम, माहिती फलक आदी कामे मंजूर झाले आहेत. लवकरच निधी उपलब्ध झाल्यास पर्यटकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळतील. ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर या पर्यटनस्थळाला देखणा नजराना पाहता येणार आहे.
भांबवली पुष्प पठाराचेही आकर्षणभांबवली हे एक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ म्हणून गौरविले जाते. भांबवली, वजराई धबधबा व भांबवली पुष्प पठार ही येथील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत. हा संपूर्ण परिसर दाट जंगल व विपुल निसर्गसंपदेने नटला आहे. भविष्यात दुर्लक्षित राहिलेल्या भांबवली पुष्प पठाराचाही जागतिक पातळीवर लौकिक होईल. पूर्ण परिसराचा सर्र्वांगीण पर्यटन विकास होईल, अशी आशा स्थानिकांना लागली आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा व जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे यांचे भांबवली हिल स्टेशन विकासासाठी पूर्ण सहकार्य लाभत आहे. पर्यटकांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा; परंतु माहिती फलकांची मोडतोड करू नये. प्लास्टिक बाटल्या इतरत्र टाकू नये व स्थानिकांना सहकार्य करावे.- रवींद्र बळीराम मोरे, पर्यटन प्रमुख,सह्याद्री पठार विभाग विकास संघ, सातारा