सातारा : जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तिसरी लाट लहानग्यांसाठी घातक असल्याने शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे उन्हाळ्यातील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात न आल्याने त्याची रक्कम बँकेत जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे खाते उघडायला पालक मुलांसह बँकेत जाऊन गर्दी करत आहेत. त्यामुळे आहार भत्ता विद्यार्थ्यांच्या जिवावर उठू नये अशी भावना व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ्यातील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला नाही. त्याऐवजी आहाराची तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या आदेशाने पालक वर्गात गोंधळ उडाला आहे, कारण १५० रुपयांच्या रकमेसाठी बँक खाते उघडावे लागणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी हजार रुपये भरावे लागत आहेत. ही रक्कम खात्यात जमा करण्याऐवजी थेट शाळेतून प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आली असती तर कोविड काळातील पालकांचा हा त्रास वाचला असता.
केंद्राची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आहे. याअंतर्गत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. शाळा सुरू असते तेव्हा विद्यार्थ्यांना तांदळाचे वाटप केले जाते. मात्र १५ एप्रिल ते १५ जून हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा काळ व लॉकडाऊन यामुळे विद्यार्थी या आहारापासून वंचित राहिले. या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या खर्चाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे.
पोषण आहारांतर्गत पहिली ते पाचवी इयत्तीतील एका विद्यार्थ्याला ४ रुपये ४० पैसेप्रमाणे ३५ दिवसांचे १५६ रुपये ८ पैसे, तर सहावी ते आठवी इयत्तेतील एका विद्यार्थ्याला ६ रुपये ७१ पैसे एका दिवसाचे देण्यात येणार आहेत. म्हणजे २३४ रुपये ८५ पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. विद्यार्थ्यांच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यास हजार रुपये लागतात. यामुळे पालकांसमोर पेच पडला आहे. येणाऱ्या रकमेपेक्षा बँक खाते उघडण्यास जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. मग बँक खाते उघडावे की नाही, असा प्रश्न पालकांसमोर पडला आहे.
चौकट :
माझी मुलगी पाचवीत शिकते. शालेय पोषण आहाराची रक्कम तिच्या खात्यात १५६ रुपये जमा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी गेलो तर हजार रुपये लागतील असे सांगण्यात आले. शून्य टक्के रकमेवर आता खाते काढले जात नाही असे उत्तर बँकेने दिले. आता १५६ रुपयांसाठी हजार रुपये भरावेत का? असा प्रश्न आहे.
- आशा महामुलकर, गोडोली
खाते नाही उघडले तर म्हणे शिक्षक जबाबदार!
एकीकडे तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना कोरोनाचा धोका आहे म्हणून काळजी घ्या म्हणायचे आणि दुसरीकडे बँकेत खाते काढण्यासाठी गर्दीत जाण्यास भाग पाडायचे हे विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून ढकलणाऱ्या अधिकाऱ्यांना काय म्हणायचे? असा प्रश्न पालकांना पडला आहे. शिक्षण विभागातील अधिकारी यांनी सक्त आदेश देत खाती नाही उघडली तर शिक्षक जबाबदार, असे म्हटल्याने पालकांनी खाते उघडावे यासाठी शिक्षकांनी तगादा लावला आहे. यामुळे वैतागलेल्या पालकांनी व्यावहारिकदृष्ट्या हे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.