सातारा, 12 : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या माध्यमातून गुरुवारी या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले.
याप्रकरणी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांशी गरीब, कष्टकरी, विधवा महिला तसेच पुरुषांचा समावेश आहे.
स्वयंपाक शिजविण्याबरोबरच त्यांना वर्ग सफाई, स्वच्छतागृहांची सफाई, अशी दुय्यम दर्जाची कामेही करावी लागतात. त्याचे कोणतेही ज्यादा मानधन शासन देत नाही. तसेच कामाहून कधीही काढून टाकण्याचा धोका असतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर सतत टांगती तलवार असते. या परिस्थितीत शासनाने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.
या आंदोलनात रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे, मिलिंद लोहार, वर्षा लोहार, नीलम कांबळे, संगीता पोपळकर, कोमल कदम, वीमल शिंदे, वनीता साळुंखे, मनीषा वायदंडे, संगीता आवळे, सरिता कांबळे, जयश्री साळुंखे, आर. एस. सुतार, रेणुका काकडे, मंदा चव्हाण यांची उपस्थिती होती.अशा आहेत मागण्या
- १८ हजार रुपये किमान वेतन द्यावे
- कर्मचाऱ्यांना चपराशी कम कूक पदावर नेमणूक करावी
- थकीत बिले दिवाळीपूर्वी जमा करावीत
- महिला कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट म्हणून ५ हजार द्यावेत
- मोफत गॅस कनेक्शन व गणवेश द्यावा