वाई : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ ज्या श्री रायरेश्वरावर घेतली त्याच रायरेश्वरावर स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिकच्या कचऱ्याच्या शपथ घेत वाई व सातारा येथील छत्रपतीचे सेवक गृपच्या पन्नास सदस्यांकडून सुमारे १० पोती कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. श्री रायरेश्वरावर आज प्लास्टिकच्या कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. सुट्यांचे दिवस असले की श्री रायरेश्वर येथे गडावर फिरायला येणाऱ्या पर्यटककांडून प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्य पदार्थांचे प्लास्टिक कागद, पाण्याच्या, शीत पेयाच्या मोकळ्या बाटल्या बेजबाबदारपणे फेकल्या जातात यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते.
घाणीमुळे पठारावर अस्वच्छता पसरलेली होती. त्या पार्श्वभूमीवर छत्रपतींचे सेवक गृपच्या सदस्यांनी श्री रायरेश्वर येथे स्वच्छता मोहीम राबिवली. या मोहिमेत सदस्यांसह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.
यावेळी श्री महादेव मंदिर परिसरातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. नंतर गोमुख कुंड परिसर, मंदिरापासून ते शिडीपर्यंतच्या मार्गातील सर्व कचरा उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. या मार्गामध्ये सुमारे १० पोती कचरा संकलित करण्यात आला.
वाई व सातारा येथील छत्रपतीचे सेवक गृपच्या निवृत्ती पाटील, अक्षय शिंदे, अतुल चव्हाण, गणेश गुजर, राहुल जाधव, रोहित चव्हाण, कुशल निंबाळकर, स्वप्निल शिंदे, कोमल संकपाळ, काजल संकपाळ, संतोष शिंदे यांनी पन्नास सदस्यांसह ग्रामस्थांनी रायरेश्वराव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
ऐतिहासिक वस्तूंचे पावित्र्य राखणे आपले आद्य कर्तव्य आहे. गडकिल्ल्यावर गेल्यावर प्रत्येकाने स्वयंआचार संहिता पाळली पाहिजे. परिसरात अस्वच्छता दिसल्यास स्वच्छता करून पावित्र्य राखले पाहिजे.- निवृत्ती पाटील, सदस्य कृष्णाई सोशल फोरम वाई
वाई येथील शिवप्रेमींकडून रायरेश्वरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.