दहिवडी : जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊनबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करीत मंगळवारपासून दहिवडीत लॉकडाऊन करण्यात आला.
कापड दुकाने, हार्डवेअर, ज्वेलर्स, स्टेशनरी, सिमेंट, इलेक्ट्रीक दुकाने, पानपट्टी, सलून, ब्युटीपार्लर यासारखी दुकाने तसेच शाळा, मंदिर आज बंद करण्यात आली. तर बेकरी, भाजीपाला, फळे, किराणा दुकान, मेडिकल, बँका, पतसंस्था ही उघडी होती. पोलिसांनी स्वतः दहिवडी शहरातून लाऊडस्पीकरने जनजागृती केली. काही ठिकाणी व्यापारी व पोलिसांमध्ये किरकोळ वादाचे प्रसंग दिसले. दुपारनंतर मात्र बाजारपेठेत वर्दळ कमी झाली होती. दरम्यान, विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी दंड केला. अनेक व्यापाऱ्यांनी आदेशच न वाचल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे सकाळी अनेक दुकाने सुरू झाली. मात्र, पोलिसांनी दहिवडी शहरात फिरून सांगितल्यानंतर काही दुकाने बंद झाली.