कऱ्हाड : प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. टाळेबंदीशिवाय पर्याय नसल्याची प्रशासनाची भूमिका आहे, तर निर्बंध पाळतो, पण ‘लॉकडाऊन’ नको, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एका बाजूला प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर दुसरीकडे व्यापारी कात्रीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
सलग दुसऱ्या वर्षी तिसऱ्यांदा होत असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे जनता पुरती धायकुतीला आली आहे. ‘हे’ चालू, ‘ते’ बंदचा खेळ पुन्हा सुरू झाला असून या परिस्थितीत व्यापारी, व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. कऱ्हाडात पोलिसांकडून निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या टोळबंदीविरोधात सर्वसामान्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याबरोबरच व्यापारी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. बाजारपेठेवर निर्बंध घाला. वेळेची मर्यादा ठेवा. मात्र, संपूर्ण टाळेबंदी मागे घ्या, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.
टाळेबंदीमुळे गत दीड वर्षापासून व्यवसायाचे तीनतेरा वाजले आहेत. बाजारपेठ बंद असल्यामुळे आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने टाळेबंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. कऱ्हाडातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर संपूर्ण बाजारपेठ अद्यापही बंदच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह लहान-मोठ्या विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.
- चौकट
दुकाने सुरू ठेवण्याचा इशारा
कऱ्हाडातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. निर्बंधाचे पालन करून सायंकाळपर्यंत व्यवसायाची मुभा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दुकाने सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. व्यापारी, विक्रेत्यांनी टाळेबंदी झुगारून दुकाने सुरू ठेवली तर हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे.
- चौकट
खासदारांनी बाजू मांडली
व्यापारी असोसिएशनने मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील यांनीही व्यापाऱ्यांची बाजू प्रशासनासमोर मांडली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहारही केला आहे.
- चौकट
कऱ्हाडातील व्यापारी व विक्रेते
ज्वेलर्स : १२ टक्के
कापड : १६ टक्के
किराणा : १७ टक्के
इलेक्ट्रिक : ११ टक्के
भाजी, फळ : २० टक्के
इतर : २४ टक्के
- चौकट
टाळेबंदी केली; पण ‘हे’ थांबलंय का.?
१) कर्जावरील व्याज
२) बँकांची वसुली
३) फायनान्सचे हप्ते
४) गाळा, घरभाडे
५) वीज बिल वसुली
६) घरपट्टी आकारणी
७) पाणीपट्टी आकारणी
- कोट
सराफ व्यवसाय सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या व्यवसायासाठी व्यापाऱ्यांनी मोठे कर्ज घेतलेले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे कर्जाचे हप्तेही भरणे कठीण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे निर्बंध लावावेत. मात्र, दुकाने उघडण्याची परवानगी मिळावी.
- बाबूराव पवार
ज्वेलर्स, कऱ्हाड
- कोट
गतवर्षीपासून व्यवसाय अडचणीत सापडला आहे. मध्यंतरी तीन ते चार महिने व्यवसाय झाला. मात्र, गतवर्षीचे नुकसानही त्यातून भरून निघाले नाही. सध्या पुन्हा लॉकडाऊन करून व्यापाऱ्यांवर प्रशासनाने उपासमारीची वेळ आणली आहे. प्रशासनाने लॉकडाऊन हटवावा. निर्बंध पाळून व्यापारी व्यवसाय करतील.
- अविनाश पाटील
कापड विक्रेते, कऱ्हाड
फोटो : ०७केआरडी०२
कॅप्शन : प्रतीकात्मक