पुसेसावळी : आक्षेपार्ह पोस्टनंतर उसळलेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेत काही जणांनी बाजारपेठ उघडण्यास विरोध दर्शविला आहे. जोपर्यंत युवकांना या गुन्ह्यातून वगळले जात नाही, तोपर्यंत बाजारपेठ सुरू होणार नसल्याची भूमिका संबंधितांनी घेतली आहे.पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून रविवारी रात्री दंगल उसळली. या दंगलीनंतर तेथील बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली. मंगळवारी सायंकाळी बाजारपेठ सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काही दुकाने सुरू करण्यात आली होती. त्यामुळे बुधवारपासून सर्वकाही सुरळीत होईल, अशी अपेक्षा असताना बुधवारी सकाळीच काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास विरोध दर्शवला.
चर्चा निष्फळगुन्ह्यात अटक केलेल्यांपैकी काही युवकांचा या घटनेशी कसलाच संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करून संबंधित व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंदच ठेवली. ग्रामपंचायत प्रशासन तसेच पोलिसांकडून यावेळी व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही कोणीही दुकान उघडले नाही. त्यामुळे गावात शांतता असली तरी बाजारपेठेत पूर्णतः शुकशुकाट जाणवत आहे.
कोणावरही अन्याय होणार नाही: बापू बांगरदरम्यान, दंगल प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असून गुन्हा निष्पन्न होणाऱ्यांवरच कारवाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार तपास सुरू असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जात असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी सांगितले.
अप्पर पोलिस अधीक्षक तळ ठोकूनदंगलीच्या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पुसेसावळीतील हालचालींवर लागून राहिले आहे. या सर्व घटनेत पोलिस प्रशासनावर प्रचंड ताण आहे. गावात शांतता राहावी, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्यासह अधिकारी पुसेसावळीत तळ ठोकून आहेत. गावात अद्यापही कडक पोलिस बंदोबस्त तैनात आहे.