वाठार स्टेश्न : कोरेगावच्या उत्तर भागात पावसाने दडी मारल्याने गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वी दुष्काळी परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीच्या विघ्नामुळे परिसरातील गणेश मंडळांचे देखावे व डेकोरेशनवर मयार्दा येण्याची शक्यता आहे. पावसाअभावी मूर्ती विसर्जनासाठी कोठेही पाणी उपलब्ध नसल्याने भक्तांची नाराजी दिसून येत आहे.
उत्तर कोरेगावातील गणेशोत्सव जिल्ह्यात ओळखला जातो तो जिवंत देखाव्यामुळे. पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन, देऊर, बिचुकले, अंबवडे संमत वाघोली या गावांसह परिसरात अनेक ठिकाणची मंडळे सामाजिक समस्या , अध्यात्म व पौराणिक देखावे साकारतात. त्यात लहान मुले , मुली, महिला व ज्येष्ठ नागरिक सहभाग घेतात. तसेच विसर्जन मिरवणुकीतही समाज प्रबोधनपर विषयावर जनजागृती केली जाते. त्यासाठी कार्यकर्ते महिनाभर तयारी करत असतात. मात्र यंदा मॉन्सून जवळपास कोरडा गेला.
भुर भुर पावसावर खरीप हंगामातील पेरणी झाली. त्यानंतर पाऊस न पडल्याने घेवडा व वाटाणा ही नगदी पिके हातातून जाण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या कडक उन्हामुळे फुलोरात असणाºया कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे केवळ शेतीवरच अवलंबून असलेली या परिसराची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे.