वडूज : येथील वनविभागाच्या कार्यालयात धिंगाणा घालत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तुळशीराम शंकर माळी (रा. कलेढोण) याच्यावर वडूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार, दि. १२ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कलेढोण (ता. खटाव) येथील तुळशीराम शंकर माळी याने वनविभागाच्या कार्यालयात येऊन येथील वन अधिकाऱ्यांना ‘आपण दिलेल्या अर्जाची माहिती मला कधी देणार,’ असे म्हणाले. त्यावर वन अधिकारी यांनी थोड्या वेळात माहिती तयार करून माळी यास लेखी स्वरूपात तयार करून दिली असता त्यांनी ती माहिती पाहून संबंधित माहितीचे कागद पाहून वन अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकून दिले. दरम्यान, आपणास दिलेली माहिती योग्य वाटत नसेल तर तुम्ही ही माहिती वरिष्ठ कार्यालयात जाऊन घ्या, असे वन अधिकारी यांनी सांगितले असता त्यांनी ‘तुमचे वरिष्ठ बाजीराव कोण लागून गेलेत, त्यांना इथे बोलवा मी इथून जाणार नाही, मी येथेच झोपणार आहे,’ असे म्हणून ‘तुम्हाला लई मस्ती आली आहे, असे अर्वाच्य भाषेत बोलून कार्यालयाची खुर्ची फेकून देऊन पायातील चपला फिर्यादीच्या दिशेने फेकून मारण्याचा प्रयत्न केला, तसेच माहिती घेतल्याशिवाय इथून जाणार नाही, अशी धमकी माळी याने दिली. तसेच यापूर्वीही माळी याने वनविभागातील कर्मचाऱ्यांना काही कारण नसताना वेळोवेळी त्रास दिला आहे. या घटनेची फिर्याद खटाव तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल फुंदे यांनी दिली. याबाबत तुळशीराम माळी याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर करीत आहेत.