सातारा : ग्रेड सेपरेटरमधून वाहने जाण्याचा मार्ग सुकर झाला असला तरीही, त्याच्या बाह्य बाजूला पादचाऱ्यांचे हाल होणार हे नक्की आहे. ग्रेड सेपरेटरला लागून असलेल्या बहुतांश जागा शासकीय मालकीच्या आहेत. त्यांचे हस्तांतरण करून पादचाऱ्यांसाठी पदपथ तयार करण्याचा विचार व्हावा, अशी भूमिका सातारकरांनी मांडली आहे.
ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास येत असतानाच त्याच्या बाह्य रस्त्यावर पदपथ नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर विविध मान्यवरांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ग्रेड सेपरेटरच्या बाह्य बाजूला बहुतांश जागा या सरकारी मालकीच्या आहेत. त्यामुळे त्यातील अवघ्या सहा फुटांची जागा मिळाली तरी, कुठंही तोडफोड आणि हस्तांतरणाची प्रक्रिया न करता पदपथ तयार होऊ शकतो. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन उपायायोजना करावी, अशी आग्रही भूमिकाही सातारकरांनी मांडली आहे.
कोट :
१.
ग्रेड सेपरेटर झाल्याने सातारकरांचे आयुष्य ट्रॅफिकजामविरहीत झाल्याचे समाधान आहे. एखादं मोठं काम सुरू असताना त्यात काही त्रुटी राहण्याची शक्यता आहे. सेपरेटरच्या बाह्य बाजूस फूटपाथ नसल्याचे निदर्शनास आल्यावर त्याची तजवीज करावी.
- कन्हैयालाल राजपुरोहित
२.
ग्रेड सेपरेटरच्या बाह्य बाजूला बहुतांश जागा या सरकारी आहेत. सार्वजनिक विकासाच्या कामासाठी जर कोणाची खासगी जागा घेणं जसं नियमात आहे, तसंच सरकारी जागेतील सहा फूट जागा घेणं फार कठीण नाही. निव्वळ कंपाऊंडची भिंत जरी आत घेतली तरी मोठा पदपथ तयार होईल.
- अनिल दातीर, आर्किटेक्ट
३.
चौकट :
दुरुस्तीसाठी गडकरी अन् पवार यांचेही शब्द!
पोवईनाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू झाल्यानंतर या मार्गाने बाहेर येणाऱ्या गाड्या महाराजा सयाजीराव विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्यावतीने डॉ. अनिल पाटील यांनी संस्था अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गांभीर्य विषद केले. वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून, हा रस्ता यवतेश्वर बाजूस नेण्याचे सूचित केले. तशीच परिस्थिती मोनार्क चौकातही झाली. वाहतूक थेट चौकात येत असल्याने ती थोडी पुढं न्यावी, असं स्थानिकांनी सुचविल्यानंतर ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील द्वारापर्यंत नेण्यात आली आहे.
पॉईंटर
हे आहेत काही पर्याय...
१. रयत शिक्षण संस्थेच्या विरुध्द बाजूला नागरी वसाहत आणि त्याला लागूनच क्रीडांगण आहे. क्रीडांगणाचा काही भाग पदपथासाठी उपयोगात येऊ शकतो.
२. पोवईनाक्याकडून बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला सभापती निवास तर दुसरीकडे जिल्हा सैनिक बोर्डाचे कार्यालय आणि जिल्हा बँकेची इमारत आहे. जिल्हा बँकेच्या इमारतीची आणि सभापती निवासाच्या कंपाऊंडची जागा पदपथासाठी हस्तांतरित करावी.
३. मोनार्क हॉटेल चौकात एका बाजूला खासगी जागा आहे, तिथं पदपथ आहे. पण विरुध्द बाजूला जिल्हाधिकारी कार्यालयाची भिंत आहे. या भिंतीची जागाही सरकारी असल्याने त्याचाही उपयोग पदपथासाठी होऊ शकतो.