सातारा : हलगर्जीपणामुळे इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून एका बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदारावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.बांधकाम व्यावसायिक विवेक शंकरराव निकम (वय ४५, रा. अजिंक्यतारा हौसिंग सोसायटी, सदर बझार, सातारा), ठेकेदार लालडेसाब इस्माईल बागवान (रा. कर्मवीरनगर, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील फुटका तलाव येथील लोकमंगल अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याच्या बाहेरील भिंतीचे वॉटर प्रुफिंगचे काम करण्यासाठी गणेश सुरेश ढाणे (वय ३२, रा. पाडळी, ता. सातारा)हे दि. १० डिसेंबर २०१३ रोजी गेले होते.
यावेळी झोल्याची रस्सी तुटून अचानक ते खाली पडले. त्यावेळी तेथे ठेकदार बागवान व बांधकाम व्यावसायिक विवेक निकम तेथे नव्हते. इतरांच्या मदतीने गणेश ढाणे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले.
निकम व बागवान यांनी वॉटर प्रुफिंगचे काम करताना ढाणे व त्यांच्या सहकाऱ्याला सुरक्षितेच्या दृष्टीने कोणतीच दक्षता घेतली नव्हती, असे नीलेश ढाणे यांनी गणेश यांच्या पत्नी रोहिणी ढाणे यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन दोघांच्या हलगर्जीपणामुळे गणेश ढाणे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी निकम आणि बागवान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.