सातारा : वृद्ध आई- वडिलांना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या माजी सैनिकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश शामराव सावंत (वय ४५, रा. नागेवाडी, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कांताबाई शामराव सावंत (वय ७१, रा.नागेवाडी, ता. सातारा) यांचा मुलगा गणेश सावंत हा काही वर्षांपूर्वी सैन्य दलातून निवृत्त झाला. त्यानंतर तो घरीच राहू लागला. ‘तू मला जेवण का नीट करून देत नाहीस, जेवण तिखट का करतेस, तुला जेवण बनावता येत नाही का. तुम्ही माझ्या जीवावर जगता. मी तुमचे काहीही बघणार नाही. तुम्ही इथून निघून जा.’ असे तो वारंवार आईला धमकी देऊ लागला. तसेच मारहाण करू लागला. वृद्ध वडिलांनाही तो अशाच प्रकारे वागणूक देत त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी टाळत होता. त्यामुळे कांताबाई यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.त्यानंतर पोलिसांनी गणेश सावंत याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याला कायदेशीर नोटीस तसेच समुपदेशन केल्यानंतर त्याला घरी जाऊ दिले. त्याने चांगले वागण्याची हमी लिहून दिली असल्याचे सहायक फौजदार बागवान यांनी सांगितले.
वृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करून सांभाळ करण्यास नकार; माजी सैनिकावर गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Published: October 01, 2022 7:13 PM