मल्हारपेठ : तंटामुक्ती अध्यक्षांना जातीवाचक शिवीगाळ करून ग्रामसेवकांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विहे (ता. पाटण) येथे शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत विहे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवाजी तुकाराम चंदुगडे (रा. पाल, ता. कऱ्हाड) यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवराज विश्वनाथ पाटील (वय ४०) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहे येथील युवराज काशिनाथ पाटील व संग्राम रघुनाथ पाटील या चुलत भावांमध्ये मिळकत नंबर ११५४वरून गत दोन वर्षांपासून वाद सुरू आहे. याबाबत संग्राम पाटील हे बांधकाम करत असताना युवराज पाटील अडथळा आणत असल्याबाबतची तक्रार पाटणचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रार अर्जावर कार्यवाही करून केलेल्या कारवाईचा अहवाल पाठविण्याचे आदेश ग्रामपंचायत कार्यालयाला मिळाले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ग्रामसेवक शिवाजी चंदुगडे तसेच सरपंच दिनकर कुंभार, उपसरपंच अविनाश पाटील, पोलीसपाटील हिंमतराव पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पवार हे चौकशी करण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या युवराज पाटील याने ‘तुम्ही इथे कशाला आलात’, असे विचारत या कामापासून परावृत्त करून शासकीय कामात अडथळा आणला. तसेच तंटामुक्त समिती अध्यक्षांना जातीवाचक शिवीगाळ केली, अशी फिर्याद ग्रामसेवक शिवाजी चंदुगडे यांनी पोलिसात दिली आहे. त्यावरून युवराज पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.