सातारा : छत्रपती शिवाजी महाराज व आपल्या देशाबाबत अवमानकारक पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. अशा प्रकारामुळे समाजात तेढ निर्माण होत असून, महापुरुषांवरील आक्षेपार्ह वक्तव्य कदापी खपवून घेतले जाणार नाही. साताऱ्यात झालेला प्रकार निंदनीय आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.सातारा शहरात दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. संतप्त शिवभक्तांनी गुरुवारी शिवेंद्रसिंहराजे यांच्या एका समर्थकाच्या कार्यालयाची देखील तोडफोड केली होती. या सर्व घडामोडींबाबत शिवेंद्रसिंहराजे यांनी शुक्रवारी दुपारी सुरुची या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले, छत्रपती शिवराय हे राज्यालाच नव्हे तर देशाला, जगाला वंदनीय आहेत. सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या संशयित अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे असतानाही पुन्हा पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. शहरातील वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न कोण मुद्दाम करतंय का? याचा शोध घेऊन सायबर विभागाने या प्रकरणाचे सत्य समोर आणावे. दोषी कोणाच्याही जवळचा का असेना, त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणात सायबर सेल कुठेतरी कमी पडत असल्याची खंत व्यक्त करून शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, वेळीच हे अकाउंट ब्लॉक केले असते तर पोस्ट व्हायरल झाल्या नसत्या. सायबर सेलने हे प्रकरण थोडेसे गांभीर्याने घ्यायला हवे. शहराला जो त्रास होत आहे त्याबद्दल आधी पोलिसांनी कारवाई करावी. पोलिसांकडून यश आलं नाही तर आम्हाला उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलावे लागेल. साताऱ्यातील हिंदू - मुस्लिम बांधवांनी सलोखा राखावा. पोलिस या प्रकरणातील सत्य लवकरच शोधून काढतील, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे यांनी केले
महापुरुषांवरील आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, शिवेंद्रसिंहराजे यांचा इशारा
By सचिन काकडे | Published: August 18, 2023 4:22 PM