कऱ्हाड : ‘सह्याद्री कारखान्याच्या सभासदांच्या भावना ध्यानात घेऊन या निवडणुकीत दोन पावले पुढे-मागे करत एकास एक उमेदवार देऊन यश खेचून आणू,’ असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे यांनी केले. मत्यापूर, ता. सातारा येथे सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड उत्तरचे स्वाभिमानीचे अध्यक्ष सचिन नलवडे, धनाजी शिंदे, भरत गायकवाड, संदीप माने, महेश चव्हाण, महेश कदम, कृष्णत शेडगे, वैभव चव्हाण, रोहित माने, लक्ष्मण ताटे, विकास घोरपडे, अंजनकुमार घाडगे, धनाजी जाधव, सचिन पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. घोरपडे म्हणाले, ‘विद्यमान सत्ताधाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्र्त्यांची ताकद समजली आहे. कमी कालावधीत तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे मला मिळालेली मते नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. प्रस्थापितांच्या विरोधात असणारे नकारात्मक मतदान एकत्रित करण्यात यश आले. तर सह्याद्रीचा निकाल सांगण्याची गरज उरणार नाही. त्यासाठी पाऊल थोडेसे पुढे-मागे करावे लागेल, एकास एकच उमेदवार द्यावा लागेल. यासाठी कार्यकर्त्यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.’ अंजनकुमार घाडगे म्हणाले, ‘सह्याद्री हा जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा कारखाना मानला जातो. मात्र, शेतकऱ्यांना ऊसदर देताना हा त्यांचा क्रमांक कोठे जातो, हे माहीत नाही. यापूर्वी उसाची काटामारी या कारखान्यात नेहमीच झाली आहे. पण यावर्षी एफआरपी चोरण्याचे काम सुरू आहे. गेली दहा वर्षे बिनविरोध सत्ता आयती मिळाल्याने सभासदांना व शेतकऱ्यांना किंमत उरलेली दिसत नाही. त्यामुळे सभासदांना त्यांची किंमत आणि हक्क मिळवून देण्यासाठी ही लढाई महत्त्वाची आहे.’ यावेळी अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारखान्याच्या एककल्ली कारभारावर टीका केली अन् एकत्र येऊन हे ‘भूत’ एकदा खाली उतरवूया, अशा भावना व्यक्त केल्या.(प्रतिनिधी)
एकास एक उमेदवार देऊ
By admin | Published: February 13, 2015 12:13 AM