पुसेगाव : पुसेगावात आलेल्या भाविक-भक्तांनी एकाच दिवसात ५५ लाख ९३ हजार ५६७ रूपयांची देणगी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर मनोभावे अर्पण केली. श्री सेवागिरींच्या ६ ८व्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार, दि ८ जानेवारी रोजी खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. रथमिरवणुकीदरम्यान रथावर अमेरीका, इंग्लंडसह विविध देशातील परदेशी चलनांच्या नोटाही भाविकांनी अर्पण केल्या. रथावर अर्पण केलेल्या रकमेत यंदा गतवर्षी पेक्षा २ लाख ७५ हजार ४८५ रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली. गतवर्षीच्या रथोत्सवात ५३ लाख १८ हजार ८२ रुपये देणगी जमा झाली होती.यावर्षी देणगी रक्कमेत लक्षणीय वाढ झाली आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस शनिवारी सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला आणि रात्री अकरा वाजता मिरवणूक संपवून रथ माघारी मंदिरात पोहोचला. यानंतर सेवागिरी महाराजांच्या मंदिरासमोर नोटांनी शृंगारलेला रथावरुन नोटांच्या माळा व परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही सर्व रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव-पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव, अॅड. विजयराव जाधव यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांच्या अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली. रात्री साडे अकरा वाजता प्रत्यक्ष देणगी रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पुर्ण झाले. रथावरील देणगी रक्कम मोजण्याकरता विविध बॅँका व सहकारी पतसंस्था व स्वयंसेवकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
सेवागिरींच्या रथावर ५६ लाख अर्पण
By admin | Published: January 10, 2016 12:49 AM