सातारा : महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांतून पुसेगाव यात्रेसाठी आलेल्या भक्तांनी एका दिवसात श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर ५८ लाख ४३ हजार ८५२ रुपयांची देणगी मनोभावे अर्पण केली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रथावरील देणगीत ७ लाख ६४ हजार ६०१ रुपयांची वाढ झाली आहे. या देणगीमध्ये अमेरीका, इंग्लंड, भुतान, नेपाळ, झिम्बाँबे, सिंगापूर, कुवेत येथील परकीय चलनांचाही समावेश आहे.
श्री सेवागिरी महाराजांच्या ७० व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार, दि. १७ डिसेंबर रोजी पुसेगाव येथे रथ सोहळा उत्साहात पार पडला. सुमारे सात लाख भाविकांनी हा सोहळ्याला हजेरी लावली. रथोत्सव सुटीच्या दिवशी आल्याने पहाटेपासूनच भाविकांची संख्या वाढत होती. रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी नोंटाच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती. सकाळी अकरा वाजल्यापासून गर्दीत वाढ होत गेली अन् महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकोळून गेला. यंदा दरवर्षीपेक्षा भाविकांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून आले.
भाविकांनी आपापल्या परिने १०, २०, ५०, १०० तसेच नव्या ५०० व २००० रुपयांच्या नोटांच्या माळा रथावर अर्पण केल्या. नोटाबंदीच्या काळानंतर रथावर किती देणगी जमा होणार, याबाबत उत्सुकता लागली होती. मात्र, या वर्षी देणगी रकमेत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७ लाख ६४ हजार ६०१ रुपयांची लक्षणीय वाढ झाली. भाविकांनी एकूण ५८ लाख ४३ हजार ८५२ रुपयांची देणगी रथावर मनोभावे अर्पण केली.रथ मिरवणुकीस रविवारी सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ झाला आणि रात्री दहा वाजता रथोत्सवाची सांगता झाल्यानंतर रथ मंदिरात पोहोचला. या ठिकाणी रथावरून नोटांच्या माळा व परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आले. पोलिस बंदोबस्तात ही सर्व रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. रात्री अकरा वाजता प्रत्यक्ष देणगी रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले.या देशांच्या नोटायावर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावरील देणगी रकमेत, भारतीय चलनाबरोबरच इतर देशांतील चलनी नोटा भक्तांनी रथावर अर्पण केल्या. यामध्ये थायलंड, युनायटेड अरब अमिरात, कतारचा, युरो, इंग्लंड, यूएसए, दुबई, कुवेत, इंडोनेशिया, सुदान, युके, झिम्बाँबे, बांग्लादेश या देशांच्या नोटांचा समावेश आहे.श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेश जाधव यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली.