ज्योतीप्रसाद सावंत-आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अल्बर्ट डिसोझा यांची, तर उपाध्यक्षपदी प्रा. सुनील शिंत्रे यांची बिनविरोध निवड करून संचालक मंडळांतर्गत असणारे वादळ तूर्तास शमविण्यात यश आले असले, तरी कारखाना चालविताना वर्षभरात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याने आव्हानांचे काय? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच आहे.आजरा साखर कारखाना गत पंचवार्षिक निवडणुकीवेळी ‘स्वबळावर’ चालविण्याचे सभासदांना आश्वासन देऊन सत्ताधारी मंडळी सत्तेवर आली आहेत. गेल्या चार वर्षांत संचालकांमधील मतभेद सर्वसामान्यांनी अगदी जवळून पाहिले आहेत. या मतभेदाचे परिणाम म्हणजे कारखान्याच्या अंतर्गत घडामोडी (?) जगजाहीर झाल्या आहेत. कशात? किती ? आणि काय ? या प्रश्नांची उत्तरे सभासदच देऊ लागले आहेत.सद्य:स्थितीत झालेल्या पदाधिकारी निवडी सहजपणे झालेल्या नाहीत. राष्ट्रवादींतर्गत असणाऱ्या दोन प्रवाहांपैकी एक प्रवाह पद्धतशीरपणे राष्ट्रवादीतून बाजूला करण्यात आला आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेच्या प्रा. शिंत्रे यांना उपाध्यक्षपदाची संधी देऊन एकाचवेळी अनेक खेळ्या साध्य केल्या आहेत. अशोक चराटी, विष्णुपंत केसरकर यांच्याशी अंजनाताई-शिंत्रे गटाची जिल्हा बँक, तालुका संघ निवडणुकीपासून असणारी जवळीक हेरून कारखाना राजकारणात धोका होण्याची शक्यता गृहीत धरून शिंत्रे यांनाच उपाध्यक्षपदाची दिलेली संधी अनेक राजकीय संकेत देणारी आहे. सध्या कारखाना आर्थिक अडचणीत आहे. हंगामपूर्व तयारीसाठी सुमारे १६ कोटींची गरज आहे. तोडणी-ओढणी यंत्रणा, अॅडव्हान्स, साखरेची थकीत बिले, मशिनरी दुरुस्ती यासाठीही मोठ्या रकमांची आवश्यकता आहे. खापर फुटण्याची शक्यताथकीत पगाराचा प्रश्नही ऐरणीवर आहे. पदाचा काटेरी मुकुट डिसोझा व शिंत्रे यांच्या डोक्यावर ठेवला आहे.अंतर्गत वादामुळे कारखाना चालविण्याऐवजी तो अडचणीत आणण्यासाठीही कांही मंडळी प्रयत्नशील राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. समोर निवडणूक असल्याने झाल्या कारभाराचे खापर विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्षांवर फोडून स्वत: कानावर हात ठेवणारी मंडळीही कमी नाहीत हे निश्चित.
पदाधिकारी बदलले.. आव्हानांचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2015 9:14 PM