पुसेगाव : पुसेगाव, ता. खटाव येथे केवळ बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे भाविकांसह नागरिकांना विविध समस्यांना दररोज सामोरे जावे लागत आहे. बांधकाम विभागाच्या या निष्क्रिय कारभाराविरोधात खटाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी सार्वजिनक बांधकाम विभागाच्या बंद कार्यालयाला वंगण फासून चपलांचा हार घालून निषेध व्यक्त केला.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पुसेगाव हे मुख्य बाजारपेठेचे गाव आहे. यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. श्री सेवागिरी मंदिर ते छत्रपती शिवाजी चौक दरम्यानचा रस्ता अरुंद असल्याने सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. वारंवार सूचना देऊनही काहीही प्रगती होत नाही. श्री सेवागिरी तीर्थक्षेत्र विकासनिधीतून शासनाने रस्ता रुंदीकरण व गटारांसाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. या कामाचे टेंडर निघाले की नाही, याबाबत चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पवार यांच्याकडे वारंवार विचारणा केली. मात्र पवार हे कार्यालयात उपस्थित नसतात. यापुढे शाखा अभियंता पवार यांनी पुसेगाव कार्यालयात हजर राहून येथील कामांना चालना देण्याचे काम करावे; अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. यावेळी पुसेगाव शिवसेना शहरप्रमुख दीपक तोडकर, ज्ञानेश्वर काटकर, सूरज जाधव, विशाल जाधव, मनोज तुपे, बापू गोरे, पप्पू मदने, श्रीधर जाधव, सचिन गवळी, एम. पी. कदम, अण्णा जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)पुसेगावचा नव्याने कारभार स्वीकारला आहे. या गावातील विविध समस्यांचा निपटारा तातडीने करणार आहे. सध्या या भागात विविध ठिकाणी कामे सुरू असल्याने पुसेगावसाठी जादा वेळ देता आला नाही. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास महिनाभरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंची गटारांच्या कामाला गती येऊन ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.- एस. ए. पवार,शाखा अभियंता, पुसेगाव
बांधकाम विभागाच्या कार्यालयास फासले वंगण
By admin | Published: August 31, 2015 9:03 PM