कऱ्हाड : कऱ्हाड तहसील कार्यालयाचे कामकाज सोमवारी पर्यायी जागेत सुरू झाले़ जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सोमवारी सुरुवात झाली खरी; पण विस्कळीत साहित्य, अधिकाऱ्यांची तारांबळ अन् नागरिकांचा गोंधळ, अशी स्थिती पहिल्या दिवशी पाहावयास मिळाली़ गेल्या दोन-तीन दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीमधून साहित्य हलविण्यास सुरुवात झाली़ आजही कर्मचारी जुन्या आणि नव्या कार्यालयादरम्यान हेलपाटे मारताना दिसत होती़ नवीन ठिकाणी पूर्वीच्या अप्पर जिल्हा सत्र न्यायालय विभागात महसूल शाखा, सहायक अधीक्षक (वित्त) विभागात पुरवठा शाखा व उपकोषागार कार्यालय, अधीक्षक (प्रशासकीय) खोलीत निवडणूक शाखा, चेंबर खोलीत दुय्यम निबंधक कार्यालय, अधीक्षक कक्षेत संजय गांधी शाखा, वकील कक्षेत कार्यालयीन अभिलेख व बारनिशी शाखा, दिवाणी स्तर शाखेत तहसीलदार कक्ष, व्ही. सी. रूम आणि संगणकीयकृत सातबारा व रोजगार हमी योजना शाखा आदी शाखांची विभागवार मांडणी करण्यात आली आहे.जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सुविधांची कमतरता असल्याने याचा त्रास अधिकाऱ्यांना तर होतोच आहे; पण नागरिकांचीही यातून सुटका नाही़ महसूल विभागासह इतर कार्यालयातील फायली, महत्त्वाचे साहित्य व कागदपत्रांची गाठोडी ठेवण्यासाठी कपाटे व साधनसामुग्री तेथे उपलब्ध नाही. ना टेबल ना खुर्च्या, ना सामान्य जनतेची बैठक व्यवस्था अशा प्रकारच्या गैरसोयींचा अनुभव तेथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना येत आहे़ येथे पिण्याच्या पाण्याची, विजेची व्यवस्थाही ठीक नाही़ त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते़ अस्वच्छ परिसर, सुविधा नसलेले स्वच्छतागृह अशा विविध अडचणी या ठिकाणी असताना कोणत्याही नियोजनाशिवाय व पूर्वतयारीअभावी कार्यालय हलविण्यात आल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे़ सर्वसामान्य जनता कामानिमित्त येथे येत आहे. मात्र, अस्ताव्यस्त साहित्य व महत्त्वाचे विभाग कोणत्या खोलीत आहेत. याची माहितीही मिळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)बोर्ड नसल्याने नागरिकांची फसगत --कऱ्हाड तहसील कार्यालयाचे स्थलांतर जुन्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीत केले आहे, असा साधा बोर्डही महसूल विभागाकडून लावण्यात आला नाही. त्यामुळे तेथे येणाऱ्या नागरिकांची कार्यालय गेले कु ठे, असे सांगत फसगत होत होती.ऐतिहासिक वास्तूची उणीव भरून निघणार नाही --शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली ब्रिटिशकालीन इमारतीत काम करीत असताना वेगळीच छाप पडत असे; कोर्टातील वास्तूत काम करताना विशेष असे वाटत नाही. ऐतिहासिक वास्तूची उणीव या ठिकाणी काम करीत असताना नेहमी जाणवेल.- बी़ एम़ गायकवाड, निवासी नायब तहसीलदार, कऱ्हाड
खेड्यातून आलेल्या आजीबार्इंना आज तहसीलदार कार्यालय शोधताना खूपच कसरत करावी लागली़ इतर महिलांकडे चौकशी करताना आजीबाई़ अन् आजीबाई चालत सुटल्या --कऱ्हाड तहसील कार्यालयात आल्यावर कार्यालय बंद असल्याचे दिसताच बाबा कार्यालय कुठं हाय रं ! आज बंद बिंद हाय की काय ? कुणीच हितं दिसना, असं एका आजीबार्इंने एकाला विचारले, तेव्हा तहसील कार्यालय जुन्या कोर्टात गेल्याचं समजलं़ तेव्हा आजीबार्इंनी डोक्यावर हात मारून घेतला अन् आता गं बया, आता एवढ्या लांब कवा चालत जायचं म्हणत त्या चालत सुटल्या़ पहिला दिवस कधी विसरणार नाही..कऱ्हाड तहसिल कार्यालयाचे येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीत काम करणारे अधिकाऱ्यांना चांगलाच त्रास झाला. प्रत्येक अधिकारी एकच बोलत होता. आजचा पहिला दिवस कधीच विसरता येणार नाही.